Dashavatar : तगडी कमाई होत असताना ‘दशावतार’च्या निर्मात्यांचा असा निर्णय; नाराज प्रेक्षक म्हणाले ‘काय गरज?’

Dashavatar : एकीकडे बॉक्स ऑफिसवर 'दशावतार' या चित्रपटाची तगडी कमाई होत असतानाच निर्मात्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यावरून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे करण्याची काय गरज होती, असा सवाल काहींनी केला आहे.

Dashavatar : तगडी कमाई होत असताना दशावतारच्या निर्मात्यांचा असा निर्णय; नाराज प्रेक्षक म्हणाले काय गरज?
Dashavatar movie
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 16, 2025 | 1:06 PM

Dashavatar : सुबोध खानोलकर दिग्दर्शिक ‘दशावतार’ हा चित्रपट 12 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. गेल्या चार दिवसांपासून या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. माऊथ पब्लिसिटीचाही या चित्रपटाला चांगला फायदा होत असून त्याचे शोजही आता वाढवण्यात आले आहेत. एकीकडे चित्रपटाची कमाई तगडी होत असताना निर्मात्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे नेटकरी नाराज झाले आहेत. ‘झी स्टुडिओज मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली असून त्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

अवघ्या चार दिवसांत 6 कोटी रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाच्या तिकिटाचे दर कमी करण्यात आले आहेत. यासंदर्भातील पोस्ट इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. ‘दशावतार’च्या निर्मात्यांनी तिकिटांच्या दराबाबत एक ऑफर ठेवली आहे. या ऑफरनुसार, प्रेक्षकांना हा चित्रपट फक्त 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. ही ऑफर आजसाठी (16 सप्टेंबर) आहे. ‘फक्त 99 रुपयांत आपलं तिकिट बुक करा आणि अनुभवा नवरसांचा दशावतार’, असं कॅप्शन देत ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ठराविक शहरांमध्येच ही ऑफर असल्याचं त्यावर नमूद केलंय.

नेटकऱ्यांकडून नाराजी व्यक्त

‘दशावतार’च्या तिकिटाचे दर कमी करताच त्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘तिकिटाचे दर आहे तेवढेच ठेवा, कमी का करताय? चालतंय तसं चालू द्या’, असं एकाने म्हटलंय. तर ‘अरे का तिकिटाचे दर कमी करताय, चित्रपट छान आहे’, असं दुसऱ्याने लिहिलंय. ‘ऑफर दिली ही चांगली गोष्ट आहे, पण दर कमी करण्याची काही गरज नव्हती. खूप दिवसांनी तगडा मराठी चित्रपट आलाय’, असंही काहींनी लिहिलं आहे. जर कमाई चांगली होत असेल आणि प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत असतील, तर तिकिटाचे दर कमी करण्याची गरजच काय आहे, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने तब्बल 5 कोटी 22 लाख रुपयांचा गल्ला जमवला असून तो प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाला आहे. सुरुवातीला तब्बल 325 स्क्रिन्समधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या दशावतारचे 600 शोज होते, शनिवारी हा आकडा 800 एवढा झाला तर रविवारी यामध्ये वाढ होऊन तो 975 शोज असा झाला. सर्वत्र हाऊसफुल्ल बोर्ड झळकत असून प्रेक्षकांकडून ‘दशावतार’ ला प्रचंड दाद मिळत आहे.