
चित्रपट आणि ग्लॅमर जगात वैयक्तिक आयुष्याची चर्चा सर्वात जास्त होते. अनेकदा बॉलिवूड अभिनेत्रींच्या चित्रपटांपेक्षाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जास्त चर्चा झालेली आहे. तसेच काही अभिनेत्रींची नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबतही जोडली गेली होती. त्या अभिनेत्रींना त्यांच्या परिणामांनाही सामोरं जावं लागलं होतं. अशीच एक अभिनेत्री जिच्या सौंदर्याबद्दल तर संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. ही अभिनेत्री सुंदरतेच्या बाबतीत ऐश्वर्यालाही टक्कर देत होती. तिच्या सौंदर्यावर अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम देखील भाळला होता.
ही अभिनेत्री म्हणजे मेहविश. मेहविश ही एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री. जिचे नाव सौंदर्य आणि अभिनयासाठी ओळखलं जातं होतं. पण तिचं नाव एका अत्यंत वादग्रस्त व्यक्ती, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडले गेले होते, ज्यामुळे तिच्या कारकिर्दीत एक नवीन वाद निर्माण झाला.
करिअर आणि यश
मेहविश हयात ही पाकिस्तानी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिने तिच्या चित्रपटांनी लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 2015 मध्ये “जवानी फिर नही आनी” या चित्रपटाने झाली. त्यानंतर तिने “अॅक्टर इन लॉ” (2016), “पंजाब नही जाउंगी” (2017), “लोड वेडिंग” (2018) आणि “लंडन नही जाउंगी” (2022) सारख्या ब्लॉकबस्टर कॉमेडी चित्रपटामध्ये काम केले. हे चित्रपट पाकिस्तानच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी आहेत आणि त्यांनी मेहविशला एक यशस्वी व्यावसायिक अभिनेत्री म्हणून स्थापित केले आहे. तिच्या कारकिर्दीने भरभराट होत असतानाच, अभिनेत्रीचे नाव वादात अडकले.
दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या अफवा
2019 मध्ये, जेव्हा मेहविश हयातला पाकिस्तान सरकारने प्रतिष्ठित नागरी सन्मान “तमघा-ए-इम्तियाज” प्रदान केला, तेव्हा तिचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडले जाऊ लागले. अफवा पसरल्या की तिला हा सन्मान अंडरवर्ल्ड डॉनच्या मदतीने मिळाला. काही वृत्तांत असाही दावा केला गेला की दाऊद इब्राहिम तिच्या आयटम नंबरमधील अभिनयाने प्रभावित झाला होता आणि त्याने तिला पाकिस्तानी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका मिळवून दिल्या. ज्या काळात मेहविशची कारकीर्द भरारी घेत होती, त्या काळात दाऊद पाकिस्तानात असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. तथापि, मेहविशने कधीही या विषयावर सार्वजनिकपणे भाष्य केलेले नाही.
“फन्ने खां”ची ऑफर
दरम्यान मेहविशला बॉलिवूडमधील “फन्ने खाँ” या बॉलीवूड चित्रपटात शॉर्टलिस्ट केलं गेलं होतं. पण तिच्या नावावर असलेले वाद पाहता तिच्या ऐवजी ऐश्वर्या रायला ही भूमिका देण्यात आली. खरं तर, त्या वेळी पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटांमध्ये काम करण्यास बंदी देखील घालण्यात आली होती. त्यामुळे मेहविशला अखेर ऐश्वर्याने रिप्लेस केलं.
राजकारणात रस आणि पंतप्रधान होण्याची इच्छा
अभिनयाव्यतिरिक्त, मेहविश हयातची राजकारणातली आवड देखील चर्चेचा विषय राहिली आहे. एका मुलाखतीत तिने एक दिवस पाकिस्तानचा पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली. तिने म्हटलं होतं की, “जर इम्रान खानसारखा क्रिकेटपटू देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर अभिनेत्री का नाही?” समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे असे तिचे मत आहे. मेहविशने अनेक राजकीय मुद्द्यांवर आणि भारत-पाकिस्तान संघर्षावरही उघडपणे तिचे विचार व्यक्त केले आहेत. ती सोशल मीडियावर देखील ती खूप सक्रिय असते.