Bigg Boss Marathi 6 Finale : पाच लाख रुपये नाकारणं पडलं महागात; टॉप 5 मधून कोण बाहेर?
Bigg Boss Marathi 6 Finale : रितेश देशमुखने पाच लाख रुपयांचा चेक देऊन घराबाहेर पडण्याची ऑफर टॉप 5 स्पर्धकांना दिली होती. परंतु कोणीच तो चेक स्वीकारला नव्हता. अखेर पाचपैकी एका स्पर्धकाला त्या रकमेशिवाय घराबाहेर पडावं लागलं.

‘बिग बॉस मराठी 6’च्या ग्रँड फिनालेमध्ये पाच स्पर्धक पोहोचले होते. राकेश बापट, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, तन्वी कोलते आणि अनुश्री माने या पाच जणांमध्ये ट्रॉफीसाठी चुरस रंगली होती. या पाच स्पर्धकांसमोर सूत्रसंचालक रितेश देशमुखने मोठी ऑफर ठेवली होती. ब्रीफकेसमध्ये पाच लाख रुपयांचा चेक होता आणि बझर दाबून कोणत्या तरी एका स्पर्धकाला तो चेक घरी न्यायचा होता. परंतु पाचही स्पर्धकांनी तो चेक स्वीकारायला नकार दिला होता. अखेर ज्या स्पर्धकाला सर्वांत कमी मतं मिळाली, त्याला घराबाहेर पडावं लावलं. रितेशने जो लिफाफा उघडला, त्यात दिपाली सय्यदचं नाव होतं. ब्रीफकेसमधील चेक कोणी स्वीकारावा, असा प्रश्न घरातील सर्व माजी स्पर्धकांनाही विचारण्यात आला होता. तेव्हा बहुतांश स्पर्धकांनी दिपालीचं नाव घेतलं होतं. तरीसुद्धा तिने चेक घेणं नाकारलं होतं.
बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडल्यानंतर दिपाली म्हणाली, “आत शंभर दिवस राहणं खूप कठीण आहे. घरात असताना माझ्या सासूबाई आजारी होत्या, त्यांना विचारूनच मी बिग बॉसमध्ये आले होते. मधल्या काळात जे घडलं, तेव्हा मनात बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु एकदा का प्रवास सुरू केला, की शंभर दिवस पूर्ण करूनच मी बाहेर येईन असं ठरवलं. मी आत शंभर दिवस राहिले, हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली आहे. कारण मी सतत काहीतरी जिद्दीने करत असते, हे त्यांना माहीत आहे. मी बिग बॉसमध्येही छान खेळेन, असा विश्वास त्यांना होता.” दिपालीने जरी पाच लाख रुपये नाकारले असले तरी बिग बॉसकडून तिला एक लाख रुपयांचा चेक मिळाला.
‘बिग बॉस मराठी 6’च्या ग्रँड फिनालेमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन पाहुणा म्हणून पोहोचला होता. यावेळी त्याने रितेशचं आणि शोचं कौतुक केलं. “रितेश माझ्या छोट्या भावासारखा आहे. मी त्याला गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून ओळखतो. रितेशला इथे बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन करताना पाहून मला खूप आनंद होतोय. या शोचं सूत्रसंचालन रितेशइतकं दमदार कोणी दुसरं केलंच नसतं. मी सोशल मीडियावर या शोला ट्रॅक करतोय आणि नुकताच हा सर्वाधिक पाहिलेला शो ठरल्याचंही समजतंय”, अशा शब्दांत अभिषेक बच्चन व्यक्त झाला.