
अभिनेता धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. धर्मेंद्र आजारी असताना पहिल्यांदाच त्यांचं कुटुंब एकत्र आलं होतं. धर्मेंद्र यांची पहिली बायको प्रकाश कौर आणि दुसरी बायको हेमा मालिनी या दोघीही धर्मेंद्र यांच्या अखेरच्या काळात त्यांच्यासोबत होत्या. त्यामुळे देओल कुटुंब अखेर एकत्र झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. अनेकांना हे चित्र पाहून हायसंही वाटलं होतं. पण धर्मेंद्र यांच्या शोक सभेत मात्र वेगळच चित्र दिसलं. मुंबईत झालेल्या या शोकसभेत हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुली दिसल्या नाहीत. यावरून देओल फॅमिलीत बेबनाव कायम असल्याचं दिसून आलं होतं.
धर्मेंद्र यांची पहिली शोकसभा पार पडलेली असतानाच आता हेमा मालिनी यांनीही धर्मेंद्र यांची दुसरी शोकसभा आयोजित केली आहे. वृंदावन येथे या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. संत समाजाकडून यावेळी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. हेमा मालिनी या मथुराच्या खासदार आहेत. त्यांनीच सोशल मीडियावर पोस्ट करून या दुसऱ्या शोकसभेची माहिती दिली आहे. या शोकसभेला बॉबी आणि सनी देओल जाणार की नाही याची माहिती नाही. पण दुसरी शोकसभा घेण्यात आल्याने देओल कुटुंब विखुरलं असल्याची चर्चा होत आहे.
संत समाज देणार श्रद्धांजली
13 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून ते संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. वृंदावन येथील छटीकारा रोडवरील श्रीकृष्ण जन्माष्टमी आश्रमात या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. धर्मेंद्र यांचं ब्रजभूमीशी वेगळं नातं होतं. या ठिकाणी त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आणि त्यांना श्रद्धा सुमन आर्पित करण्यासाठी या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या शोकसभेला धर्मेंद्र यांचे चाहते, स्थानिक प्रतिष्ठीत नागरिक आणि संत समाज धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करेल, असं हेमा मालिनी यांनी म्हटलंय.
मुंबईतील शोकसभेला अनुपस्थित
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव सनी देओल आणि बॉबी देओल यांनी मुंबईत शोकसभेचं आयोजन केलं होतं. या शोकसभेला हेमा मालिनी, ईशा आणि अहाना देओल उपस्थित राहिल्या नव्हत्या. या शोकसभेला बॉलिवूडमधील जवळपास सर्व कलाकार उपस्थित होते.
म्हणून घेतला निर्णय
धर्मेंद्र यांचं ब्रजभूमीवर अतोनात प्रेम होतं. त्यामुळेच हेमा मालिनी यांनी वृंदावनमध्ये श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रजवासींकडूनही धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली जावी हा त्यामागचा हेतू आहे.