100 कोटींच्या उंबरठ्यावर ‘देऊळ बंद 2’; किरण गायकवाडची प्रवीण तरडेंसाठी भावूक पोस्ट

गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर देऊळ बंद 2 चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात कमाई केली असून हा चित्रपट 100 कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता आहे.

100 कोटींच्या उंबरठ्यावर ‘देऊळ बंद 2’; किरण गायकवाडची प्रवीण तरडेंसाठी भावूक पोस्ट
| Updated on: Jun 26, 2026 | 7:05 PM

Kiran Gaikwad : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संघर्षाची वेदना आणि स्वामी समर्थांच्या भक्तीचा प्रभावी संगम घडवणारा ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवत आहे. 21 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या पाच आठवड्यांत तब्बल 90 कोटी रुपयांची कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम रचला आहे. आता हा चित्रपट प्रतिष्ठेच्या 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

चित्रपटाच्या या दणदणीत यशानंतर अभिनेता किरण गायकवाड यांनी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासाठी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्यांच्यावरील आदर आणि अभिमान व्यक्त केला आहे.

‘100 कोटींपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास’

इन्स्टाग्रामवर प्रवीण तरडे यांचा फोटो शेअर करत किरण गायकवाडने लिहिले, “एकांकिका, नाटकं, मालिका लेखन ते थेट 100 कोटींचा सिनेमा… यालाच खरं झपाटलेपण म्हणतात. अनेक वर्षांपासून ज्यांना मी ओळखतो, ज्यांच्यासोबत ‘चौक’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, ते आज मराठी चित्रपटसृष्टीत 100 कोटींच्या शिखरावर अभिमानाने उभे आहेत. ते म्हणजे माझे ‘गुरुजी’ प्रवीण तरडे. त्यांच्या या यशाचा मला मनापासून अभिमान वाटतो.”

पुढे त्याने मराठी चित्रपटसृष्टीबद्दलही अभिमान व्यक्त करत म्हटले, मराठी सिनेमा कोणापेक्षा कमी नाही, हे ‘देऊळ बंद 2’मधून गुरुजींनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. मराठीत मोजकेच चित्रपट या टप्प्यापर्यंत पोहोचले आहेत आणि त्यामध्ये आता प्रवीण तरडे यांचं नाव अभिमानाने घेतलं जाईल. त्यांच्या दिग्दर्शनाखाली पुन्हा काम करण्याची इच्छा आजही कायम आहे.

‘रक्ताचं पाणी करून मिळवलेलं यश’

किरण गायकवाडने प्रवीण तरडे यांच्या मेहनतीचाही विशेष उल्लेख केला. दिवस-रात्र न पाहता सातत्याने काम करणारा, नवनवीन कल्पनांवर मेहनत घेणारा आणि स्वतःला सतत घडवत राहणारा हा माणूस आहे. त्यांनी अक्षरशः रक्ताचं पाणी करून हे यश मिळवलं आहे. त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. एकांकिकेच्या मातीतून जन्माला आलेली ताकद थेट 100 कोटींचा इतिहास घडवू शकते, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. मराठी सिनेमाची ही घोडदौड अशीच अविरत सुरू राहो, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

Follow Us