
बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ अर्थात दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. त्यांना निधनानंतर त्यांच्याशी संबंधित विविध गोष्टी समोर येत आहेत. अशातच त्यांच्या प्रॉपर्टीचाही उल्लेख होत आहे. धर्मेंद्र यांचा जन्म पंजाबच्या नसरालीमध्ये झाला असला तरी लुधियानामधील डांगो या वडिलांच्या गावाशी त्यांचं खास नातं होतं. धर्मेंद्र यांनी बालपणातील तीन वर्षे याच गावात व्यतीत केली होती. डांगो गावातील ज्या घरात त्यांनी आपलं बालपण घालवलं, त्याची किंमत आता कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. आता धर्मेंद्र यांचे काका आणि चुलत भाऊ या कुटुंबाच्या जमिनीची देखरेख करतात. ‘दैनिक भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार ते कायम या जमिनीवर पीकलेलं पीक आणि इतर उत्पादनं मुंबईला पाठवायचे.
धर्मेंद्र यांच्या वडिलांनी त्यांच्याकडे वडिलोपार्जित संपत्तीची देखरेख करण्याची जबाबदारी दिली होती. हीच गोष्ट लक्षात ठेवत धर्मेंद्र यांनी नंतर ती जमीन त्यांच्या काकांच्या नातवंडांना सोपवली, जेणेकरून गावात राहून ते जमिनीची देखभाल करू शकतील. धर्मेंद्र यांचं त्यांच्या पुतण्यांवर खूप प्रेम होतं. त्यांनी पुतण्यांना जवळपास 2.50 एकर वडिलोपार्जित जमीन दिली होती. लुधियाना इथल्या एका कापड गिरणीत काम करणारा त्यांचा पुतण्या बुटा सिंग म्हणतो की बहुतांश लोक त्यांच्या जमिनीचा एक छोटासा तुकडाही देत नाहीत. पण धर्मेंद्र यांनी त्यांना इतकी मोठी मालमत्ता सोपवली. कारण ते आम्हाला त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग मानत होते.
धर्मेंद्र यांनी त्यांच्या पुतण्यांना दिलेली वडिलोपार्जित जमीन कोट्यवधी रुपयांची आहे. लुधियाना जिल्ह्यातील डांगो इथल्या जमिनीची नेमकी किंमत ऑनलाइन उपलब्ध नाही, परंतु जवळपासच्या जमिनीच्या दरांनुसार पाहता, त्याची किंमत प्रति एकर सुमारे 2 कोटी रुपये आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या या जमिनीची किंमत सुमारे पाच कोटी रुपये आहे.
2013 मध्ये धर्मेंद्र एका चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त डांगो या गावी गेले होते. हा क्षण त्यांच्यासाठी प्रचंड भावनिक होता. गावात गेल्यावर त्यांनी त्यांच्या बालपणीच्या घराजवळील माती कपाळावर लावली. तिथल्या मातीच्या घरात ते दहा ते पंधरा मिनिटं रडले. त्यानंतर दोन वर्षांनी 2015 मध्ये जेव्हा धर्मेंद्र डांगो इथं परतले, तेव्हा त्यांनी कायदेशीररित्या ती वडिलोपार्जित जमीन त्यांच्या पुतण्यांना हस्तांतरित केली.