Sunny Deol: वडिलांचा ‘तो’ सीन पाहून सनी देओलचा पारा चढलेला; थेट दिग्दर्शकालाच मारहाण

राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक रणबीर पुष्प यांनी धर्मेंद्र यांच्या बी-ग्रेड चित्रपटांमधील कामामागील सत्य उघड केलं आहे. दिग्दर्शक कांती शाह यांनी एक्शन दृश्यांना रोमान्समध्ये कसं रुपांतरित केलं, हे त्यांनी सांगितलं.

Sunny Deol: वडिलांचा तो सीन पाहून सनी देओलचा पारा चढलेला; थेट दिग्दर्शकालाच मारहाण
सनी देओल, धर्मेंद्र
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 12, 2026 | 1:48 PM

बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र आणि सनी देओल यांचं नातं नेहमीच चर्चेत राहिलं आहे. पडद्यावर दमदार भूमिका साकारणाऱ्या या बाप-लेकाची एकमेकांबद्दलची काळजीही अनेकदा समोर आली आहे. मात्र, धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीतील एका वादग्रस्त घटनेमुळे सनी देओल प्रचंड संतापला होता, असा किस्सा सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, या घटनेत एका दिग्दर्शकाला सनी देओलने मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. धर्मेंद्र यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र, करिअरच्या एका टप्प्यावर त्यांनी कमी बजेटच्या बी-ग्रेड आणि सी-ग्रेड चित्रपटांमध्येही काम केलं. अशाच एका चित्रपटाशी दिग्दर्शक कांती शाह यांचं नाव जोडलं जातं. कांती शाह हे बी-ग्रेड चित्रपटांसाठी ओळखले जात होते.

एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान धर्मेंद्र यांच्याकडून काही दृश्ये शूट करण्यात आली. मात्र, नंतर त्या दृश्यांचा वेगळ्या पद्धतीने वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. धर्मेंद्र यांना या प्रकाराची पूर्ण कल्पना नव्हती. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक रणबीर पुष्प यांनी याविषयी एका मुलाखतीत सांगितलं. रणबीरने त्यांच्या कारकिर्दीत 50 ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या कथा लिहिल्या आहेत. त्यांनी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि कमल हासन यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबतही काम केलंय. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत रणबीर पुष्पने ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांच्याबद्दलचा हा किस्सा सांगितला.

धर्मेंद्र यांच्या सीनमुळे सनी संतापला

धर्मेंद्र यांच्यासोबत घोडेस्वारीचं दृश्य शूट करण्यात आलं होतं. त्याचवेळी त्यांच्या बॉडी डबलचा वापर करून दुसरं वादग्रस्त दृश्य चित्रित करण्यात आलं. नंतर या दृश्यांचं एडिटिंग करून ते एकमेकांशी जोडण्यात आल्याचा दावा आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांना अशा प्रकारच्या दृश्यात दाखवलं गेल्याचं समोर आलं. ही बाब सनी देओलच्या लक्षात आल्यानंतर तो प्रचंड संतापला, त्याने थेट दिग्दर्शक कांती शाह यांना जाब विचारला आणि त्यांना मारहाणही केली.

याविषयी रणबीर पुष्प पुढे म्हणाले, “धर्मेंद्र यांनी बी आणि सी ग्रेडचे चित्रपट का केले मला समजलं नाही. त्यात काहीच अर्थ नव्हता. ते एक सज्जन अभिनेते होते. त्यांनी नेहमीच चांगले संबंध जपले आहेत. कदाचित त्यांना जेव्हा कथा सांगितली गेली, तेव्हा ते दृश्य वेगळं असेल. पण जेव्हा चित्रपट बनला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं असेल की हा त्या दर्जाचा चित्रपट नाही. मी त्या काळात धर्मेंद्रजींशी फारसं बोललो नाही. कधीकधी माणूस हे काम निरागसपणेही करतो.”

कांती शाह हे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक आहेत. त्यांनी मिथुन चक्रवर्ती आणि धर्मेंद्र यांच्यासोबत काम केलं. मार धाड, बसंती टांगेवाली, मुन्नी बाई, जरुरत आणि दरवाजा यांसारख्या चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us