धर्मेंद्र यांच्याबद्दल ‘ही’ एक गोष्ट Google वर सर्वाधिक होतेय सर्च, जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
गुगलवर वर्षभर सर्वाधिक काय सर्च करण्यात आलं, याची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. 2025 या वर्षांत धर्मेंद्र यांच्याविषयीची एक गोष्ट गुगलवर नेटकऱ्यांनी सर्वाधिक सर्च केली. ही कोणती गोष्ट, ते जाणून घ्या..

वर्षभरात सर्च इंजिनवर सर्वाधिक काय सर्च केलं गेलं, याचा आढावा दरवर्षी गुगलकडून वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर महिन्यात घेतला जातो. याच आढाव्याची यादी गुगलवर जारी करण्यात आली आहे. या यादीत कुंभमेळ्यानंतर धर्मेंद्र यांच्याबद्दल नेटकऱ्यांनी सर्वाधिक सर्च केलं आहे. त्यातही धर्मेंद्र यांच्याबद्दल नेमकं काय सर्च करण्यात आलं, याचाही खुलासा गुगलकडून करण्यात आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यापूर्वी त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे धर्मेंद्र यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांनी गुगलवर त्यांच्याविषयी सर्वाधिक सर्च केलं.
2025 मध्ये सर्च करण्यात आलेले टॉप 5 न्यूज इव्हेंट्स
या यादीत पहिल्या क्रमांकावर महाकुंभ मेळा आहे. त्यानंतर धर्मेंद्र आणि तिसऱ्या क्रमांकावर बिहार निवडणुका आहेत. चौथ्या क्रमाकांवर भारत-पाकिस्तानबद्दल सर्च करण्यात आलं. तर पाचव्या स्थानी दिल्ली निवडणुकांचा निकाल आहे.

धर्मेंद्र यांच्याविषयी सर्वाधिक काय सर्च केलं?
धर्मेंद्र यांच्याविषयी पाच गोष्टी सर्वाधिक सर्च करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सर्वांत जास्त विचारला गेलेला किंवा सर्च केलेला प्रश्न म्हणजे धर्मेंद्र जिवंत आहेत की नाहीत? कारण ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. नंतर हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित या अफवांना खोटं म्हटलं होतं.

दुसऱ्या क्रमांकावर धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी सर्च करण्यात आलं. तर तिसऱ्या क्रमांकावर धर्मेंद्र यांच्याबद्दलचे न्यूज अपडेट्स सर्च करण्यात आले. धर्मेंद्र आज जिवंत आहेत का, असा सवालही सर्वाधिक सर्च करण्यात आला आहे. याशिवाय धर्मेंद्र यांच्या मृत्यूचं कारणंही नेटकऱ्यांनी गुगलवर सर्च करून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात ते व्हेंटिलेटरवर असल्याचंही म्हटलं गेलं होतं. त्यादरम्यानच त्यांच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. काही वृत्तमाध्यमांनीही धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त प्रसारित केलं होतं. यावरून हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.
