
बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झालं. कलाविश्व आणि संपूर्ण देओल कुटुंबीयांसाठी ही अत्यंत धक्कादायक घटना होती. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कुठे ना कुठे पाहिलं गेलं. त्यांच्या दुसऱ्या पत्नी हेमा मालिनी यासुद्धा कॅमेरासमोर आल्या होत्या. परंतु या सर्वांत त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर कुठेच दिसल्या नव्हत्या. आता धर्मेंद्र यांच्या निधनाच्या जवळपास दोन महिन्यांनंतर प्रकाश कौर पहिल्यांदाच कॅमेरासमोर आल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओमध्ये प्रकाश कौर या मुलगा सनी देओलसोबत हात पकडून चालताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये सनी देओल अत्यंत जबाबदार मुलाप्रमाणे त्याच्या आईचा हात घट्ट पकडून चालताना दिसत आहे. प्रत्येक पावलावर तो आईला सांभाळतोय आणि त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतोय. तर प्रकाश कौर यांनी त्यांच्या डोळ्यांवर काळा चष्मा लावलेला दिसत आहे. यावेळी सनी देओलच्या चेहऱ्यावर अत्यंत गंभीर भाव असून मीडियाशी किंवा पापाराझींशी न बोलताच तो तिथून निघून जातो. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘दु:खाच्या वेळी मुलगा हाच आईची सर्वांत मोठी ताकद असतो’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘प्रकाशजींच्या चेहऱ्यावरील निराशा पाहून माझं मन भरून आलं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.
प्रकाश कौर या धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी आहेत. 1954 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. या दोघांना सनी, बॉबी, अजिता आणि विजेता अशी चार मुलं आहेत. धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं. असं असलं तरी त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता किंवा त्यांची साथ सोडली नव्हती. प्रकाश कौर या कायम प्रकाशझोतापासून दूरच राहणं पसंत करतात.
एका मुलाखतीत प्रकाश कौर यांनी हेमा मालिनी यांच्याविषयी मत मांडलं होतं. “तिचा धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय चुकीचा होता. मी तिच्या जागी असती तर कधीच कोणाचं घर मोडलं नसतं”, असं त्या म्हणाल्या होत्या. इतकंच नव्हे तर प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांचा बचावही केला होता. हेमा यांच्याशी दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यावर प्रकाश कौर म्हणाल्या होत्या की, “धर्मेंद्र यांच्याशिवाय असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी त्यांच्या पत्नीला सोडून दुसरं लग्न केलं. मात्र माझ्या पतीने असं केलं नाही. ते संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन पुढे जात आहेत.”