
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ अर्थात धर्मेंद्र हे 450 कोटी रुपयांहून अधिक संपत्तीचे मालक होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीच्या वारसा हक्कावरून विविध चर्चा होत आहेत. धर्मेंद्र यांचे दोन कुटुंब आहेत, ही गोष्ट तर जगजाहीर आहे. धर्मेंद्र यांच्या पश्चात पहिली पत्नी प्रकाश कौर आणि सनी, बॉबी, अजिता, विजेता ही चार मुलं, दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि ईशा, अहाना या दोन मुली असा मोठा परिवार आहे. इतकंच नव्हे तर धर्मेंद्र यांना 13 नातवंडंसुद्धा आहेत. धर्मेंद्र यांच्या मृत्यूपत्रात कोणाकोणाची नावं आहेत आणि त्यांच्या संपत्तीची वाटणी कशा पद्धतीने होणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नुकतंच समोर आलेल्या रिपोर्ट्समध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येतंय की ईशा आणि अहाना देओल यांना धर्मेंद्र यांच्या प्रॉपर्टीतून त्यांचा पूर्ण हिस्सा मिळणार, असं सनी देओलने म्हटलंय. देओल कुटुंबाच्या एका जवळच्या व्यक्तीने असंही म्हटलंय की, ईशा आणि अहाना यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याची सनी देओलची अजिबात इच्छा नाही. सर्व मुलांना त्यांचा हक्क मिळावा, अशी धर्मेंद्र यांचीही इच्छा होती.
‘फर्स्ट पोस्ट’च्या एका रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने असं म्हटलं गेलंय की, ‘सनी-बॉबी आणि ईशा-अहाना यांच्यात वारसा हक्कावरून ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्या पूर्णपणे खोट्या आहेत. अत्यंत चुकीच्या वेळी अशा अफवा पसरवल्या जात आहेत. इथे कोणीच गरीबीत नाही. त्यामुळे कोणताच ड्रामा किंवा कोणताच वाद होणार नाही. ईशा आणि अहाना यांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवलं जाणार नाही. संपूर्ण देओल कुटुंब सध्या शोकाकुल आहे. त्यामुळे पुढे काय होणार, हे विचार करण्याच्या मनस्थितीत कोणीच नाही.’
धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती 400 ते 450 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातंय. यामध्ये मुंबईतील त्यांचा आलिशान बंगला, लोणावळ्यातील फार्महाऊस यांचाही समावेश आहे. याच फार्महाऊसमध्ये धर्मेंद्र त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौरसोबत राहायचे. धर्मेंद्र यांनी प्रॉडक्शन हाऊसमध्येही पैसे गुंतवले होते.