
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. हा चित्रपट प्रदर्शित होऊन दीड महिना उलटूनही थिएटरमध्ये अजूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. ‘धुरंधर’ने जगभरात तब्बल 1300 कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी, सारा अर्जुन यांच्या भूमिका आहेत. ‘धुरंधर’च्या शेवटी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्याचसोबत त्याची तारीखसुद्धा सांगण्यात आली होती. 19 मार्च 2026 रोजी ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा दुसरा भाग थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या दुसऱ्या भागाच्या टीझरसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे.
दिग्दर्शक आदित्य धरने प्रेक्षकांची नाडी चांगलीच ओळखली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची जराही नाराजी होऊ नये यासाठी त्याने ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’चा टीझर अत्यंत प्रभावी आणि आधीपेक्षा अधिक दमदार बनवला आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून अ प्रमाणपत्र मिळालं आहे. ‘न्यूज 18’ने दिलेल्या वृत्तानुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) 19 जानेवारी रोजी या टीझरला मान्यता देत अ प्रमाणपत्र प्रदान केलं. या टीझरचा कालावधी अंदाजे 1 मिनिट 48 सेकंद आहे. ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’च्या टीझरमध्ये प्रेक्षकांना भरपूर अॅक्शन आणि हिंसाचार पहायला मिळणार आहे. सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’सोबत ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’चा टीझर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं वृत्त आहे. म्हणजेच जे प्रेक्षक बॉर्डर 2 हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाणार, त्यांना इंटरव्हल किंवा सुरुवातीलाच धुरंधर 2 चा टीझर पहायला मिळेल.
रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात कंदहार विमान अपहरण, 2001 मधील संसदेवरील हल्ला आणि 26/11 च्या मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांच्या कारवायांवर आधारित कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळालं आहे. तर काहींनी त्यावर प्रचारकी असल्याची टीकासुद्धा केली आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे.