
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने काही अशा कलाकारांचं नशीब पालटलं, जे गेल्या दशकांपासून चित्रपटसृष्टीत काम तर करत होते, पण त्यांना स्टारचा दर्जा मिळत नव्हता. त्यापैकी एक म्हणजे अक्षय खन्ना आणि दुसरे राकेश बेदी. या चित्रपटात रेहमान डकैतची भूमिका साकारून अक्षय खन्ना यशाच्या शिखरावर पोहोचला. तर राकेश बेदी यांच्या जमील जमालीच्या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. ‘धुरंधर’ ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे आणि दररोज कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. चित्रपटाचं हे विक्रमी यश पाहून राकेश बेदी भावूक झाले. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला आहे. ‘धुरंधर’ या चित्रपटातील विविध भूमिकांसाठी मुकेशने कलाकारांची निवड केली.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत मुकेशने ‘धुरंधर’च्या यशावर राकेश बेदींची प्रतिक्रिया काय होती, याविषयी सांगितलं. मुकेश त्यांना नुकतेच त्यांच्या ऑफिसमध्ये भेटले होते. “राकेश बेदी मला म्हणाले, मी गेल्या 49 वर्षांपासून काम करतोय, पण मला आता ज्याप्रकारे स्टार बनल्यासारखं वाटतंय, तसं कधीच वाटलं न्हतं. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते”, असं मुकेशने सांगितलं.
‘धुरंधर’ या चित्रपटात राकेश बेदी हे कराचीतील एका राजकारणी जमील जमालीच्या भूमिकेत आहेत, जो गँगस्टर रेहमान डकैतला पाठिंबा देतो. त्यांच्या निवडीबद्दल मुकेशने पुढे सांगितलं, “मला नेहमीच लोकांना चकीत करायला आवडतं. कास्टिंग करण्यामागचं माझं हेच तत्त्वज्ञान आहे. मी नेहमी हाच विचार करतो की, मी प्रेक्षकांना कसं चकीत करू शकेन? मी या पात्रांना कसं नवीन वळण देऊ शकेन?”
‘धुरंधर’ या चित्रपटात रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, राकेश बेदी, सारा अर्जुन यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळालं आहे. जगभरात ‘धुरंधर’ने तब्बल 1167 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या आकड्यासह रणवीरचा हा चित्रपट आतापर्यंतचा सहावा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. या चित्रपटाचा सीक्वेल मार्च 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.