51 वर्षांनी लहान ‘धुरंधर’ फेम साराला किस केल्यामुळे राकेश बेदी ट्रोल; अखेर टीकेवर सोडलं मौन
'धुरंधर' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात 71 वर्षीय राकेश बेदी यांनी 20 वर्षीय अभिनेत्री सारा अर्जुनला किस केल्याची जोरदार चर्चा होती. त्यावरून नेटकऱ्यांनी राकेश बेदी यांच्यावर बरीच टीका केली होती. त्या घटनेवर अखेर त्यांनी मौन सोडलं आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटात 71 वर्षीय अभिनेते राकेश बेदी यांनी धूर्त राजकारणी जमील जमालीची भूमिका साकारली आहे. तर 20 वर्षीय अभिनेत्री सारा अर्जुन या चित्रपटात त्यांची मुलगी यालिना जमालीच्या भूमिकेत आहे. नोव्हेंबर महिन्यात जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हा त्यातील एका व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून बरीच टीका झाली होती. या व्हिडीओमध्ये जेव्हा सारा अर्जुन स्टेजवर येते, तेव्हा राकेश बेदी तिचं स्वागत करत तिला मिठी मारतात. यावेळी त्यांनी तिच्या खांद्यावर किस केल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला आणि त्यावरून त्यांना प्रचंड ट्रोल केलं. या ट्रोलिंगवर अखेर त्यांनी मौन सोडलं आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत राकेश बेदी यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. “हे सर्व किती मूर्खपणाचं आहे”, असं ते म्हणाले.
याविषयी राकेश बेदी पुढे म्हणाले, “सारा माझ्या वयाच्या अर्ध्यापेक्षाही लहान आहे आणि तिने चित्रपटात माझ्या मुलीची भूमिका साकारली आहे. जेव्हा जेव्हा आम्ही शूटिंगदरम्यान भेटायचो, तेव्हा ती माझं मिठी मारून स्वागत करायची, जसं एक मुलगी तिच्या वडिलांसोबत वागते. आमच्यात एक छान आणि सौहार्दपूर्ण नातं आहे, जे पडद्यावरही दिसून येतं. ट्रेलर लाँचच्या त्या कार्यक्रमातही काही वेगळी परिस्थिती नव्हती. पण लोकांना तिथे प्रेम दिसत नाही. एका वृद्ध पुरुषाचं एका तरुणीबद्दल असलेलं प्रेम. बघणाऱ्याच्या डोळ्यातच गडबड असेल तर आपण काय करू शकतो?”
पहा तो व्हिडीओ-
ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात सारा अर्जुनचे आईवडीलसुद्धा उपस्थित होते. “मी तिला सार्वजनिकरित्या स्टेजवर चुकीच्या उद्देशाने किस का करेन? तिचे आईवडील तिथे होते. जेव्हा लोक असा दावा करतात, तेव्हा ते मला मूर्खच वाटतात. त्यांना फक्त सोशल मीडियावर एक विषय हवा असतो वाद निर्माण करायला”, असं मत राकेश बेदींनी मांडलं. अभिनेत्री सारा अर्जुन ही प्रसिद्ध अभिनेता राज अर्जुनची मुलगी आहे. लहानपणापासूनच ती अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. याआधी तिने बऱ्याच जाहिराती आणि चित्रपटांमध्ये काम केलंय.
‘धुरंधर’ या चित्रपटात रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत कमाईचा 500 कोटींचा आकडा पार केला आहे.
