हा तर कॉपी निघाला.. ‘धुरंधर’साठी ‘सत्या’मधून कॉपी? प्रत्येक सीन जसाच्या तसा.. Video पाहून चक्रावले नेटकरी
दिग्दर्शक आदित्य धरने 'धुरंधर' या चित्रपटातील काही सीन्स 'सत्या'मधून कॉपी केल्याचा दावा या व्हिडीओद्वारे केला जात आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे. अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रणवीर सिंहच्या या चित्रपटाने तब्बल 1000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. हमजा आणि रहमान डकैत या दोन्ही भूमिकांची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. आदित्य धरच्या दिग्दर्शनाचंही कौतुक झालं. परंतु आता प्रदर्शनाच्या बऱ्याच दिवसांनंतर प्रेक्षक त्यातील बारकाव्यांवर अधिक लक्ष देत आहेत. सध्या सोशल मीडिया एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. ‘धुरंधर’मधील बरेच सीन्स आदित्यने मनोज वाजपेयीच्या ‘सत्या’ या चित्रपटातून कॉपी केल्याचा दावा या व्हिडीओतून करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना गँगस्टर भीकू म्हात्रे आठवला. इतकंच नव्हे तर रहमान डकैतच्या भूमिकेसाठी त्यातूनन प्रेरणा घेतल्याचं म्हटलंय.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ‘धुरंधर’चे 8 ते 10 सीन्स दाखवले आहेत, हे सर्व सीन्स हुबेहूब ‘सत्या’मधील सीन्स वाटतात. सीन आणि फ्रेम कॉपी केल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘धुरंधरच्या टीमने चुकीच्या फँडमशी (चाहत्यांचा गट) पंगा घेतला आहे. आदित्य सरांची डिटेलिंग पहा.. एक एक सीन कॉपी केलेला आहे. फरक इतकाच आहे की धुरंधरमध्ये अक्षय खन्नाने रहमान डकैत साकारला, तर सत्यामध्ये मनोज वाजपेयीने भीकू म्हात्रेची भूमिका साकारली होती. तुम्ही भीकू म्हात्रेला पाहिलंत तर तुम्हाला लगेच रहमान डकैतची आठवण येईल.’ या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘धुरंधर हा सत्याचा मॉडर्न व्हर्जन आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘इतके दिवस आम्ही याच भ्रमात होतो की आदित्य धर किती उत्तम दिग्दर्शक आहे. परंतु या व्हिडीओने हा विचारच बदलून टाकला’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. सत्या हा चित्रपट 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता. राम गोपाल वर्माने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि निर्मितीसुद्धा त्याचीच होती. या चित्रपटात जेडी चक्रवर्तीने सत्याची मुख्य भूमिका साकारली होती आणि मनोज वाजपेयी त्यात भीकू म्हात्रेच्या भूमिकेत होता. त्याचसोबत सौरभ शुक्ला, उर्मिला मातोंडकर, सुशांत सिंह, परेश रावल आणि आदित्य श्रीवास्तव यांच्याही भूमिका होत्या.