ऐश्वर्या रायच्या बाऊन्सरने बेस्ट बसच्या ड्राइव्हरच्या कानशिलात लगावली? नेमकं काय घडलं?

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या आलिशान कारला बेस्ट बसने मागून धडक दिल्याची घटना बुधवारी मुंबईत घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जुहूमध्ये ऐश्वर्याच्या बंगल्याजवळच ही घटना घडली आहे.

ऐश्वर्या रायच्या बाऊन्सरने बेस्ट बसच्या ड्राइव्हरच्या कानशिलात लगावली? नेमकं काय घडलं?
Aishwarya Rai
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 27, 2025 | 9:11 AM

मुंबईतील जुही इथल्या तारा रोडवर अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळ एका बेस्ट बसने आलिशान कारला धडक दिल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर बंगल्याच्या बाऊन्सरने रागाच्या भरात बेस्ट बसच्या ड्राइव्हरच्या कानशिलात लगावल्याची माहिती समोर येत आहे. अखेर जेव्हा बंगल्याच्या स्टाफने ड्राइव्हरची माफी मागितली, तेव्हा त्याने माघार घेत पोलिसांत तक्रार दाखल करणार नसल्याचं स्पष्ट केलं.

‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, बेस्ट बसने (क्रमांक 8021, मार्ग 231) जुहू बस डेपोमधून निघाल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळ कारला धडक दिली. त्यानंतर बस ड्राइव्हरने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु लगेचच बंगल्यातील बाऊन्सरने तावातावाने त्याच्या कानाखाली वाजवली. यानंतर परिस्थिती आणखीनच चिघळली आणि बस ड्राइव्हरने थेट 100 नंबरला कॉल करून पोलिसांना बोलावलं. पोलिसांनीही दोघांमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जेव्हा बंगल्याची देखरेख करणाऱ्याने बाऊन्सरच्या बाजूने माफी मागितली, तेव्हा हा वाद थंडावला. या माफीनंतर बस ड्राइव्हरने पोलिसांकडे तक्रार न करण्याचा निर्णय घेतला आणि बस सांताक्रूझ स्टेशनच्या दिशेने घेऊन गेला.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ज्या आलिशान कारला बसने धडक दिली, ती ऐश्वर्या राय बच्चनची असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु अपघात झाला तेव्हा ऐश्वर्या त्या कारमध्ये नव्हती, असं नंतर स्पष्ट झालं. पापाराझींकडून सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर तो क्षणार्धात व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी ती कार ऐश्वर्याची असल्याचं म्हटलं होतं. परंतु घटना घडली तेव्हा ऐश्वर्या कारमध्ये किंवा त्या परिसरात उपस्थित नव्हती, असं समजतंय.

ऐश्वर्याच्या जवळच्या लोकांनी स्पष्ट केलंय की ती पूर्णपणे ठीक आहे आणि तिच्यासोबत कसलाही अपघात झाला नाही”, अशी माहिती ‘इंडिया टुडे’नं दिली. तर प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर काही लोकं परिसरात जमली होती, परंतु कारचं कोणतंही नुकसान झालं नव्हतं. कारची तपासणी केल्यानंतर ती तिथून बाजून करण्यात आली होती. याप्रकरणी अद्याप बच्चन कुटुंबीय किंवा त्यांच्या प्रवक्त्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.