
‘परदेस’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या महिमा चौधरीला रातोरात प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. परंतु एका भीषण अपघातानंतर महिमाच्या करिअरवर खूप मोठा परिणाम झाला. त्यानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली. आता महिमा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यामागचं कारण म्हणजे तिचा एक व्हिडीओ. सोशल मीडियावर नुकतीच एक क्लिप व्हायरल होत आहे. ही क्लिप पाहिल्यानंतर वयाच्या 52 व्या वर्षी महिमा चौधरीने दुसरं लग्न केलं की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. कारण या व्हिडीओमध्ये ती वधूच्या रुपात नटलेली दिसत असून एका अभिनेत्यासोबत ती फोटोसाठी पोझ देतेय. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून संजय मिश्रा आहे. व्हिडीओमध्ये महिमा आणि संजय एकमेकांशी अत्यंत प्रेमाने गप्पा मारतानाही दिसत आहेत. या दोघांना अचानक अशा पद्धतीने लग्नसोहळ्याच्या पोशाखात पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘मला समजलं नाही, काहीच समजलं नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘हा महिमाचा पती आहे का’, असा सवाल दुसऱ्याने केला. ‘महिमा चौधरीने इतक्या वयस्कर व्यक्तीशी लग्न का केलं’, असाही प्रश्न आणखी एका युजरने विचारला आहे.
काही वेळानंतर महिमा चौधरीच्या या व्हिडीओमागचं सत्य समोर आलं. हा व्हिडीओ तिच्या लग्नाचा नाही तर तिच्या आगामी चित्रपटासाठीचा होता. संजय मिश्रासोबत ती ‘दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी’ या चित्रपटाचं प्रमोशन करत होती. यासाठी तिने नवरीचा लूक केला होता. तर संजय मिश्रासुद्धा विवाहाच्या पोशाखात दिसला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी हा अनोखा फंडा वापरला होता. त्याचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. महिमा आणि संजय हे ‘दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. काही दिवसांपूर्वी महिमाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर केला होता. ‘वधू भेटली आहे, आता तयार व्हा, कारण वरात लवकरच निघणार आहे.. ‘ असं कॅप्शन देत हा पोस्टर शेअर करण्यात आला होता. या चित्रपटात महिमा आणि संजय मिश्रा यांच्यासोबतच व्योम आणि पलक ललवानी यांच्याही भूमिका आहेत.