Dashavatar : 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘दशावतार’ सिनेमाने सहा दिवसांत 9.45 कोटींची कमाई केली आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ सिनेमाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमा बक्कळ कमाई करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त ‘दशावतार’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. यामुळे चित्रपटगृहात सिनेमाच्या स्क्रिन देखील वाढवण्यात आल्या आहेत. एवढंच नाही तर, दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचं देखील कौतुक होत आहे. दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली भूमिका आणि कोकणातील परंपरेची झलक दाखवणारा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे.
बॉक्स ऑफिसवर सिनेमा तगडी कमाई करत असताना लिक झाल्यामुळे सिनेमाच्या टीमने चिंता व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर, ऑनलाईन सिनेमा लिक करु नका… अशी विनंती देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणारी प्रियदर्शिनी इंदलकर हिने यासंदर्भात पोस्ट शेअर करत चाहत्यांना विनंती केली आहे.
कळकळीची विनंती असं म्हणत प्रियदर्शिनी इंदलकर पुढे म्हणाली, ‘”आपल्या ‘दशावतार’ चित्रपटाला तुम्हा रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. मराठी प्रेक्षकांची ताकद काय आहे हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक चित्रपटगृहात दिसतंय. पण त्याचवेळी काही लोक चित्रपटाची चोरुन काढलेली प्रत फोनवर डाऊनलोड करुन पाहत आहेत. चित्रपटाच्या पायरसीविरुद्ध कारवाई सुरू आहेच. परंतु आपल्याच माणसांनी आपल्या चित्रपटाबद्दल असं करणं दु:खद आहे.’
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘चित्रपट हा चित्रपटगृहातच जाऊन घ्यायचा अनुभव आहे. त्यासाठी शेकडो लोकांची मेहनत आणि पैसा लागलेला आहे. निदान मराठी माणसांनी तरी अशा चोरटेपणाला थारा देऊ नये. स्वत:ही अशी पायरेटेड प्रिंट फोनवर पाहू नये आणि इतरांनाही त्यापासून रोखावं ही विनंती!. आपल्याच सहकार्यातून मराठी चित्रपट जगणार, तगणार आणि वाढणार..’ सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘दशावतार’ सिनेमात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी अशी कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. थिएटरमध्ये ‘दशावतार’ चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल होत आहेत.