‘…आता मला मरण्याची भीती वाटत नाही’, Live कॉन्सर्टमध्ये दिलजीतचं भावनिक वक्तव्य, चाहते घाबरले
मी या जगातून निघून गेलो आहे त्यामुळे मला आता मरण्याची भीती वाटत नाही, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये दिलजीत दोसांझचं वक्तव्य. प्रेक्षक घाबरले. नेमकं काय घडलं?

30 एप्रिल 2026 रोजी कॅनडातील कॅल्गारी येथील स्कोशियाबँक सॅडलडोममध्ये दिलजीत दोसांझने आपल्या ‘Aura World Tour’ अंतर्गत दमदार परफॉर्मन्स दिला. मात्र या कॉन्सर्टनंतर काही दिवसांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यात दिलजीतने स्टेजवरून केलेल्या काही वक्तव्यांमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये दिलजीत दोसांझ परफॉर्मन्स दरम्यान अचानक थांबून प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसतो आहे. तो पंजाबी भाषेत अत्यंत वैयक्तिक आणि गंभीर विचार मांडताना दिसत आहे. तो म्हणाला की, मी या जगातून आधीच निघून गेलो आहे. मला मृत्यूची अजिबात भीती नाही. गेल्या डिसेंबरमध्ये मी या शरीरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो. पण अजून काही काम बाकी आहे, ते पूर्ण केल्यानंतरच मी हे शरीर सोडेन. त्याने पुढे प्रेम, आदर आणि माफी यांचं महत्त्वही अधोरेखित करत सांगितलं की, माझ्या मनात कुणाबद्दलही द्वेष नाही. मी सगळ्यांवर प्रेम करतो.
सोशल मीडियावर चर्चा आणि चाहत्यांची प्रतिक्रिया
ही क्लिप सर्वप्रथम इंस्टाग्रामवर शेअर झाली आणि त्यानंतर रेडिटसह इतर प्लॅटफॉर्मवर वेगाने पसरली. अनेक चाहत्यांनी या वक्तव्यामुळे चिंता व्यक्त केली. काही यूजर्सनी त्याच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल प्रश्न उपस्थित केले तर काहींनी ट्रोलिंग थांबवण्याचं आवाहन केलं. एका यूजरने लिहिलं की, यशाच्या शिखरावर असतानाही कलाकार मानसिक तणावातून जातात हे समजून घ्यायला हवं.
अलीकडेच दिलजीत दोसांझ एका दुसऱ्या कॉन्सर्टदरम्यान प्रो-खलिस्तानी आंदोलनकर्त्यांचा सामना करावा लागला होता. काही लोकांनी कॉन्सर्टमध्ये घोषणाबाजी केली आणि झेंडे दाखवले. त्यावर दिलजीतने स्टेजवरून ठामपणे उत्तर दिलं, जितके झेंडे दाखवायचे आहेत दाखवा. त्याने स्पष्ट केलं की, तो ज्या मंचावर जातो, तिथे तो पंजाबबद्दल बोलतो आणि कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी प्रचार करत नाही.
आधीही दिले आहेत ठोस संदेश
दिलजीत दोसांझने याआधीही स्टेजवरून प्रभावी संदेश दिले आहेत. 2024 मधील इंदूर कॉन्सर्टमध्ये त्याने एक गझल सादर करत समाजातील विभाजनावर भाष्य केलं होतं. या संपूर्ण घटनेनंतर एक गोष्ट स्पष्ट होते. जगभर लोकप्रियता मिळवलेल्या कलाकारांनाही मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. दिलजीत दोसांझच्या या वक्तव्यामुळे त्याच्या चाहत्यांनी त्याच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल अधिक संवेदनशील राहण्याची गरज व्यक्त केली आहे.