IND vs PAK सामनावरून दिलजीत दोसांझचा कडक सवाल; म्हणाला ‘पहलगाम हल्ल्यानंतर..’

गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने भारत आणि पाकिस्तानदरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या 'सरदारजी 3' या चित्रपटावरून झालेल्या वादावरही प्रतिक्रिया दिली आहे.

IND vs PAK सामनावरून दिलजीत दोसांझचा कडक सवाल; म्हणाला पहलगाम हल्ल्यानंतर..
दिलजीत दोसांझ, भारत-पाकिस्तानमधील सामना
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 25, 2025 | 3:52 PM

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याची भूमिका आणखी तीव्र झाली होती. त्यामुळे जेव्हा प्रसिद्ध गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझचा ‘सरदारजी 3’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्यावरून बरीच टीका झाली होती. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत काम केल्याबद्दल दिलजीतला ‘देशद्रोही’ म्हटलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर त्याचं भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली जात होती. आता जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मॅच खेळले जात आहेत, तेव्हा दिलजीतने यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो यावर मोकळेपणे व्यक्त झाला.

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन घाटी इथं मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात जवळपास 26 पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव वाढला. भारताने सर्व पाकिस्तानी चॅनल्स, सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाऊंट्स यांच्यावर सरसकट बंदी आणली होती. त्याचवेळी जेव्हा दिलजीत पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत दिसला, तेव्हा नेटकऱ्यांचा पाराच चढला होता. त्यावेळी दिलजीतने स्पष्ट केलं होतं की, त्याच्या चित्रपटाची शूटिंग पहलगाम हल्ल्याच्या आधीच झाली होती.

सध्या मलेशिया दौऱ्यावर असलेला दिलजीत याविषयी म्हणाला, “जेव्हा फेब्रुवारीमध्ये माझ्या ‘सरदारजी 3’ या चित्रपटाची शूटिंग झाली होती, तेव्हा क्रिकेट मॅच खेळले जात होते. त्यानंतर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. तेव्हा आणि आतासुद्धा आमची हीच मागणी आहे की दहशतवाद्यांना अत्यंत कठोर शिक्षा व्हावी. फरक फक्त इतकाच आहे की माझ्या चित्रपटाची शूटिंग पहलगाम हल्ल्याच्या आधी झाली होती आणि मॅच हल्ल्यानंतर खेळले गेले.”

आशिया कपच्या ‘सुपर फोर’मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान आतापर्यंत दोन क्रिकेट सामने खेळले गेले. भारत आता फायनलमध्ये पोहोचला असून टीम इंडियाने दोन वेळा पाकिस्तानच्या संघाला हरवलं आहे. आशिया कपमध्ये पाकिस्तान दुसऱ्या आणि बांगलादेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार असून जो संघ यात जिंकेल त्याच्याशी टीम इंडियाचा अंतिम सामना रंगेल.