लिव्हर कॅन्सरमधून दीपिकाची जलद रिकव्हरी; अभिनेत्रीकडून रोबोटिक सर्जरीचा खुलासा
अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज 2 लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. तिच्यावर काही दिवसांपूर्वीच सर्जरी करण्यात आली होती. या सर्जरीनंतर ती हळूहळू बरी होत आहे. नुकत्याच एका व्लॉगमध्ये दीपिकाने तिच्या सर्जरीविषयी खुलासा केला.

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करवर काही दिवसांपूर्वी स्टेज 2 लिव्हर कॅन्सरची सर्जरी झाली. तब्बल 14 तासांपर्यंत तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू होती. त्यानंतर तिला 11 दिवस रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं होतं. आता दीपिका बरी झाली असून ती घरी परतली आहे. युट्यूबवरील व्लॉगद्वारे ती सतत तिच्या आरोग्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देत आहे. दीपिकाचा पती आणि अभिनेता शोएब इब्राहिमसुद्धा तिच्या प्रकृतीविषयीची माहिती सातत्याने देत आहे. दीपिका आणि तिच्या कुटुंबीयांसाठी गेल्या काही दिवसांपासूनचा काळ खूप कठीण होता. आता सर्जरीनंतर ती आणि तिचे कुटुंबीय बाहेर फिरायला गेले आहेत.
दीपिका हळूहळू तिच्या सर्वसामान्य रुटीनमध्ये परत येतेय. तिला बरं वाटावं यासाठी शोएब तिला बाहेर फिरायला घेऊन जातो. या व्हिडीओमध्ये दीपिकाने तिच्या रिकव्हरीबद्दलची माहिती दिली आहे. तिने सांगितलं की रोबोटिक सर्जरीमुळे ती इतक्या लवकर बरी होऊ शकली. “ओपन सर्जरीनंतर बरं होण्यासाठी वेळ लागतो. जेव्हा आम्ही पहिल्यांदा डॉक्टरांना भेटलो, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझ्या केसमध्ये रोबोटिक सर्जरी करणं सर्वोत्तम पर्याय असेल. कारण ट्युमर फार पसरला नव्हता”, असं ती पुढे म्हणाली.
View this post on Instagram
याविषयी शोएबने सांगितलं, “ओपन सर्जरीमध्ये मोठा एल (L) आकाराचा कट केला जातो. परंतु रोबोटिक सर्जरीमध्ये दीपिकाच्या पोटावरील वेगवेगळ्या भागात सहा कट करण्यात आले. त्या कट्समधून ते कॅमेरा आत टाकतात आणि सर्जरी करतात. कोणती सर्जरी करायची हे रुग्णावरही अवलंबून असतं. दीपिकाच्या बाबतीत रोबोटिक सर्जरी शक्य होती. परंतु जर कोणाचं ट्रान्सप्लांट करायचं असेल तर रोबोटिक सर्जरी शक्य होत नाही. दीपिकाच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांनी रोबोटिकसोबतच दुसरा पर्यायसुद्धा खुला ठेवला होता.”
डॉक्टरांच्या मते जर सर्जरीदरम्यान एखादी समस्या निर्माण झाली असती, उदाहरणार्थ अधिक रक्तस्राव होणं वगैरे. तेव्हा रुग्णाच्या स्वास्थ्यासाठी ओपन सर्जरीचा पर्याय निवडावा लागला असता. परंतु दीपिकाच्या बाबतीत कोणतीच समस्या निर्माण झाली नव्हती, असं डॉक्टरांनी सांगितल्याचं त्यांनी म्हटलंय. दीपिकाच्या पोटावर सहा वेगवेगळ्या ठिकाणी रोबोटिक टाके आहेत. अशातच बाहेर फिरायला गेल्यावरही दीपिका घरचंच जेवण सोबत घेऊन जात असल्याचं शोएबने स्पष्ट केलं. दीपिकाने बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद केल्याचं त्याने सांगितलं आहे.
