फक्त राख राहील… डोळ्यांची काळजी घ्या… मृत्यूनंतर उघडलं दिग्दर्शकाचं पत्र, रहस्य उलगडलं?

K Bhagyaraj Final Letter : ज्येष्ठ दिग्दर्शक के भाग्यराज यांचे 27 जून रोजी वयाच्या 73व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. आता त्यांनी लिहिलेले शेवटचे पत्र समोर आले आहे.

फक्त राख राहील... डोळ्यांची काळजी घ्या... मृत्यूनंतर उघडलं दिग्दर्शकाचं पत्र, रहस्य उलगडलं?
K Bhagyaraj Letter
Image Credit source: Google
| Updated on: Jul 01, 2026 | 9:21 PM

तमिळ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे, ज्येष्ठ दिग्दर्शक के भाग्यराज यांचे 27 जून रोजी वयाच्या 73व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. त्यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी चित्रपटसृष्टीसह राजकारणातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय आणि सुपरस्टार रजनीकांत हेही अंत्यसंस्काराला हजर होते. भाग्यराज यांच्या निधनानंतर काही दिवसांनी त्यांच्या कार्यालयाने त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेले एक भावनिक निरोपपत्र शेअर केले आहे. या पत्रात त्यांनी मृत्यूनंतर आपले डोळे दान करण्याची इच्छा व्यक्त केली असून, चाहत्यांनी आपला मुलगा शांतनू भाग्यराज याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

माझ्या डोळ्यांची काळजी घ्या

भाग्यराज यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या दोन पानांचे पत्र हे तमिळ भाषेत आहे. या पत्रात त्यांनी लिहिले की, ‘माणसाला खरी आनंदाची अनुभूती तेव्हाच मिळते, जेव्हा तो आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवतो. माझे संपूर्ण आयुष्य प्रेक्षकांच्या प्रेमाभोवतीच फिरत राहिले. मी माझे डोळे फक्त तुमच्या प्रेमळ नजरा पाहण्यासाठी जपले. कृपया त्यांची काळजी घ्या.’

मुलगा शांतनूसाठी चाहत्यांकडे भावनिक विनंती

भाग्यराज यांनी आपल्या मुलगा शांतनूसाठी चाहत्यांकडे आशीर्वाद मागितले. त्यांनी लिहिले, ‘आतापासून तुमच्या टाळ्याच त्याच्यासाठी आशीर्वाद असतील. जसे प्रेम तुम्ही मला दिले, तसेच प्रेम आणि साथ आता शांतनूलाही द्या. तसेत माझे दान केलेले डोळे प्रतीकात्मक अर्थाने मृत्यूनंतरही लोकांना पाहत राहतील.

प्रेम हीच माणसाची खरी संपत्ती

पत्राच्या शेवटी भाग्यराज यांनी लिहिले, ‘हे शरीर कोणत्याही एक्सपायरी डेटसह जन्माला आलेले नाही. एक दिवस ते मातीमध्ये किंवा अग्नीत विलीन होणारच. मृत्यूनंतर शेवटी फक्त राख उरते, मात्र माणसाने आयुष्यभर कमावलेले प्रेम हाच त्याचा खरा वारसा असतो. माझ्या अखेरच्या प्रवासात ज्यांनी माझ्यावर प्रेम केले, माझ्यासाठी अश्रू ढाळले आणि मला सन्मान दिला, त्या सर्वांचा मी ऋणी आहे. माझे चित्रपट, पटकथा, संवाद आणि माझी माणुसकी यांमधून मी कायम जिवंत राहीन.

पत्रावर संमिश्र प्रतिक्रिया

भाग्यराज यांचे हे पत्र समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी प्रश्न उपस्थित केला की, एक्स वरील पोस्टखाली ‘Made with AI’ असा टॅग का दिसत आहे? तर काहींनी हा मजकूर भाग्यराज यांच्या नावाने त्यांचा मुलगा शांतनूने लिहिला असावा, अशी शंका व्यक्त केली. एकाने लिहिले की, ‘हे भाग्यराज यांचेच शब्द आहेत असे मानले, तरी त्यांनी पत्नी, मुलगी किंवा नातवंडांचा उल्लेख का केला नाही?’ दुसरीकडे काहींनी शांतनूला पाठिंबा दर्शवला. एका चाहत्याने लिहिले, ‘शांतनू भाऊ, तुम्हाला भरपूर यश मिळो. आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत.’

Follow Us