25 कोटींचा आलिशान बंगला अन् महागड्या कार, टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन असणारी एकता कपूरची संपत्ती किती?
25 कोटींचा बंगला आणि अनेक महागड्या कार, टीव्ही इंडस्ट्रीमधील क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूरची संपत्ती किती?

Ekta Kapoor Birthday: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांची कन्या आणि भारतीय टीव्ही विश्वातील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर आज प्रचंड लोकप्रिय आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये ‘क्वीन ऑफ टेलिव्हिजन’ म्हणून ओळखली जाणारी एकता कपूरने गेल्या अनेक वर्षांत असंख्य सुपरहिट मालिका प्रेक्षकांना दिल्या आहेत. 7 जून रोजी ती आपला 51 वा वाढदिवस साजरा करत असून या निमित्ताने तिच्या आलिशान जीवनशैली आणि संपत्तीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
एकता कपूरने निर्माती म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात लोकप्रिय मालिका ‘हम पांच’पासून केली. त्यानंतर तिने भारतीय टीव्ही क्षेत्राला अनेक गाजलेल्या मालिका दिल्या. ‘कसौटी जिंदगी की’, ‘कहानी घर घर की’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘नागिन’, ‘बेकाबू’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ यांसारख्या मालिकांनी ती घराघरांत लोकप्रिय झाली. तिच्या मालिकांनी अनेक वर्षे टीआरपीच्या यादीत वर्चस्व राखले.
तब्बल 95 कोटी रुपयांची मालमत्ता
माध्यमांतील अहवालांनुसार, एकता कपूरची एकूण संपत्ती सुमारे 95 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तिची वार्षिक कमाई जवळपास 30 कोटी रुपये असून, दरमहा ती 2.8 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवते. दूरचित्रवाणी आणि डिजिटल मनोरंजन क्षेत्रातील तिच्या यशामुळे तिने मोठी आर्थिक प्रगती साधली आहे.
एकता कपूर ही प्रसिद्ध निर्मिती संस्था बालाजी टेलिफिल्म्सची प्रमुख आहे. या कंपनीचे एकूण मूल्यांकन 420 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. त्यामधील एकता कपूरच्या वैयक्तिक हिस्सेदारीची किंमत सुमारे 190 कोटी रुपये असल्याचे मानले जाते.
मुंबईतील आलिशान मालमत्ता
एकता कपूरकडे मुंबईतील जुहू परिसरात ‘कृष्णा’ नावाचा आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत सुमारे 25 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. याशिवाय मुंबईतील अल्टामाउंट रोड परिसरात तिचे सुमारे 30 कोटी रुपयांचे लक्झरी अपार्टमेंटही आहे. तिच्या बालाजी टेलिफिल्म्स कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईतील अंधेरी येथे असून, त्याची किंमत सुमारे 60 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
एकता कपूरला लक्झरी कार्सची विशेष आवड आहे. तिच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत. त्यामध्ये सुमारे 70 लाख रुपयांची Jaguar F-Pace, 1.86 कोटी रुपयांची Mercedes-Benz S-Class Maybach S 500 आणि 3.57 कोटी रुपयांची Bentley Continental GT यांचा समावेश आहे.