‘ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय..’; फवाद खानच्या चित्रपटाविरोधात मनसेचा थेट इशारा

पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या 'अबीर गुलाल' या चित्रपटाला मनसेकडून विरोध केला जातोय. हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका मनसेनं घेतली आहे. फवाद खान आणि वाणी कपूरचा हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय..; फवाद खानच्या चित्रपटाविरोधात मनसेचा थेट इशारा
Fawad Khan and Vani Kapoor
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 02, 2025 | 10:09 AM

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि भारतीय अभिनेत्री वाणी कपूर यांच्या ‘अबीर गुलाल’ या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट येत्या 9 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तो भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिला आहे. चित्रपटात पाकिस्तानी कलाकाराची भूमिका असल्याने तो भारतात प्रदर्शित होण्याविरोधात मनसेची भूमिका आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. ‘ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय त्यांनी खुशाल घ्या, पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे,’ असा थेट इशारा खोपकरांनी दिला आहे.

अमेय खोपकर यांचं ट्विट-

पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच. मग त्यांना कचऱ्यात टाकायचं काम मनसैनिकांनाच करावं लागणार आणि आम्ही ते करणार, करत राहणार. ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय त्यांनी खुशाल घ्या, पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे,’ असं त्यांनी लिहिलं आहे.

‘अबीर गुलाल’ या चित्रपटाला टीझर प्रदर्शित होताच त्याला विविध चित्रपट संघटनांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. 2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास किंवा परफॉर्म करण्यास पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. तरीही अनेक राजकीय पक्ष आणि चित्रपट संघटना पाकिस्तानी कलाकारांचा विरोध करत आहेत. त्यामुळे भारतात फवाद खानचा ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही, यावर प्रश्न उपस्थित होतोय.

निर्माते आणि इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएसनचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “माझ्या माहितीनुसार, अबीर गुलाल या चित्रपटाला भारतीय स्टुडिओचा पाठिंबा नाहीये. जरी कायदेशीर बंदी नसली तरी अनेक निर्माता संघटना या भारतीय चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर फेडरेशनकडून ही कडक भूमिका घेण्यात आली. पाकिस्तानमधील कलाकारांनी इथे काम करण्याला आम्ही अजिबात प्रोत्साहन देत नाही. आम्ही याप्रकरणी सीबीएफसीला लक्ष घालण्यास सांगू. हा चित्रपट आम्ही भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही.”