ज्येष्ठ दिग्दर्शकाचं निधन, घरात आढळले मृतावस्थेत; दुर्गंधीमुळे शेजारच्यांनी केली पोलिसांकडे तक्रार

ज्येष्ठ चित्रपट निर्माते एम. एम. बेग हे त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. जवळपास सहा ते सात दिवसांपूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. शेजारच्यांना त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली, तेव्हा त्यांनी पोलिसांकडे त्याची तक्रार केली.

ज्येष्ठ दिग्दर्शकाचं निधन, घरात आढळले मृतावस्थेत; दुर्गंधीमुळे शेजारच्यांनी केली पोलिसांकडे तक्रार
बेबी गुड्डू, एम. एम. बेग
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 19, 2026 | 10:14 PM

ज्येष्ठ दिग्दर्शक एम. एम. बेग यांचं निधन झालं आहे. हिंदी सिनेसृष्टत ते त्यांच्या दमदार कामगिरीमुळे आणि बालकलाकार गुड्डूचे वडील म्हणून ओळखले जायचे. बेग हे त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले होते. त्यांनी जवळपास आठवडाभरापूर्वीच आपले प्राण सोडले होते. त्यांचे पब्लिसिस्ट हनी जावेरी यांनी याबद्दलची माहित दिली. एम. एम. बेग हे 70 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते खूप आजारी होते आणि एकटेच राहत होते, असं हनी जावेरी यांनी सांगितलं. ते म्हणाले, “त्यांना बऱ्याच दिवसांपासून स्वास्थ्यासंबंधीच्या समस्या होत्या. जेव्हा ते चार ते पाच दिवसांपासून घराबाहेर निघाले नव्हते, तेव्हा शेजारच्यांना त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली होत. त्याची तक्रार पोलिसांकडे केली असता पोलिसांनी दरवाजा तोडला. तेव्हा बेग घरात मृतावस्थेत आढळून आले.”

बेग यांच्या निधनाची माहिती पोलिसांनी त्यांच्या मुलीला दिली. त्यानंतर पोलिसांनी रात्री जवळपास 1.30 ते 2 वाजताच्या सुमारास त्यांचं पार्थिव शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवलं. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशा शब्दांत हनीफ यांनी श्रद्धांजली वाहिली.

कोण होते एम. एम. बेग?

एम. एम. बेग हे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज फिल्ममेकर होते. ते इंडस्ट्रीत बऱ्याच काळापासून काम करत होते. ते विशेषत: त्यांच्या शांत स्वभावासाठी आणि चित्रपट निर्मितीच्या कामातील समर्पणासाठी ओळखले जात होते. त्यांची मुलगी बेबी गुड्डू 1980 आणि 1990 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये झळकली आणि त्या काळातील ती एक प्रसिद्ध बालकलाकार होती. सर्वसामान्य प्रेक्षकांना जरी त्यांचं नाव फारसं माहीत नसलं तरी एम. एम. बेग यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत, विशेषत: 1980 आणि 1990 च्या दशकात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी जे. ओम प्रकाश, विमल कुमार आणि राकेश रोशन यांसारख्या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकांसोबत सहाय्यक म्हणून काम करत कारकिर्दीची सुरुवात केली होती.

त्या काळातील अनेक व्यावसायिक चित्रपटांमध्ये बेग यांनी काम केलं. ‘आदमी खिलौना है’, ‘जैसी करनी वैसी भरनी’, ‘कर्ज छकना है’, ‘काला बाजार’ आणि ‘किशन कन्हैया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. एम. एम. बेग हे राकेश रोशन यांच्या फार जवळचे होते. त्यांनी अभिनेता हृतिक रोशनला बॉलिवूड पदार्पणाच्या आधी डिक्शन, व्हॉइस मॉड्युलेशन आणि संवादाच्या सरावात खूप मदत केली होती.

Follow Us