
अभिनेता राम कपूर आणि गौतमी कपूर ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. 2003 मध्ये दोघांनी लग्न केलं. ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेदरम्यान जेव्हा राम आणि सहअभिनेत्री साक्षी तंवर यांच्यातील जवळीकीची चर्चा होऊ लागली, तेव्हा त्यांच्या नात्यात बरेच चढउतार आले. इतकंच नव्हे तर रामच्या करिअरमध्ये एक काळ असाही होता, तेव्हा दोन वर्षे त्याच्याकडे कोणतंच काम नव्हतं. त्यावेळी गौतमी त्याच्यापेक्षा चारपट अधिक कमवत होती. या सर्व गोष्टींचा त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर कसा परिणाम झाला, याविषयी गौतमी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली. त्या कठीण काळात आमच्या नात्यातील ‘स्पार्क’च हरवल्याचा खुलासा तिने केला.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत गौतमी म्हणाली, “आमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वांत कठीण काळ तोच होता, तेव्हा रामला काही वर्षे कामच मिळत नव्हतं आणि मी टेलिव्हिजनवर पुन्हा काम करायला सुरुवात केली होती. पुरुषासाठी हे खूप कठीण असतं. मला असं वाटतं की, पुरुषांची रचना अशा प्रकारे केली जाते की, त्यांच्यासाठी त्यांना कामावर जावं लागतं, त्यांना कुटुंबाचा संरक्षक किंवा सर्वकाही पुरवणारा बनावं लागतं. प्रत्येकजण पुरुषाकडे अशाच प्रकारे पाहतो. अर्थात ही परिस्थिती आता बदलत आहे, कारण आता पूर्वीसारखं काही राहिलेलं नाही. राम जवळपास अडीच वर्षे घरीच होता. त्याच्यासाठी ते खूप कठीण होतं. मी त्याची अस्वस्थता, चिंता पाहू शकत होते. कारण त्यावेळी मी कामावर जायचे. मी सकाळी 9 वाजता जायची आणि रात्री 10-11 वाजता परत यायची. त्यावेळी मला हे समजणं खूप कठीण होतं की तो घरी काहीही करत नाहीये. तो फक्त एका संधीची वाट पाहत होता.”
“हे सर्व आम्हाला मूल होण्यापूर्वीचं होतं. तो घरी असायचा आणि माझा घराशी संपर्क कमी झाला होता. मी कामावरून यायचे, झोपायचे आणि पुन्हा सकाळी कामावर जायचे. त्यामुळे आमच्यात संवादच घडत नव्हता. आमच्या नात्यातील पूर्वीच गोडवा, ओलावा कुठेतरी हरवला होता. परंतु 2006 मध्ये मुलगी सिया आणि 2009 मध्ये मुलगा अक्स यांच्या जन्मानंतर गोष्टी बदलू लागल्या. मुलांच्या जन्मानंतर त्याचं करिअर पुन्हा रुळावर आलं होतं. आता आम्ही अशा टप्प्यावर आहोत, जिथे माझी मुलं मोठी झाली आहेत. सुदैवाने आम्ही पुन्हा 20 वर्षांपूर्वीच्या काळात परतलो आहोत. आम्हाला आमच्या नात्यातील जादू पुन्हा सापडली आहे”, असं तिने पुढे सांगितलं. ‘घर एक मंदिर’ या मालिकेत काम करताना गौतमीला प्रतिदिन 5000 रुपये मानधन मिळत होतं. तर रामला प्रतिदिन 1500 रुपये मिळत होतं.