राम कपूर- साक्षी तंवरचा ‘तो’ 17 मिनिटांचा इंटिमेट सीन; पत्नीला समजताच थेट मध्यरात्री..
'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेत जेव्हा राम कपूर आणि साक्षी तंवर यांचा किसिंग सीन दाखवण्यात आला होता, तेव्हा सर्वत्र त्याची जोरदार चर्चा झाली होती. यावर एकता कपूरला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. आता रामच्या पत्नीने त्या सीनवर प्रतिक्रिया दिली आहे.

‘बडे अच्छे लगते है’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग होता. अजूनही असे असंख्य चाहते आहेत, जे ओटीटीवर किंवा युट्यूबवर या मालिकेचे जुने एपिसोड्स बघतात. यामध्ये राम कपूर आणि साक्षी तंवर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. मालिकेत जेव्हा या दोघांचा पहिल्यांदा इंटिमेट सीन दाखवण्यात आला होता, तेव्हा सर्वत्र त्याची चर्चा झाली होती. दोन-चार नाही तर तब्बल 17 मिनिटांचा हा इंटिमेट सीन होता. या सीनमुळे निर्माती एकता कपूरला त्यावेळी प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या सीनची मूळ कल्पनाच एकता कपूर असल्याचा खुलासा नंतर रामने एका मुलाखतीत केला होता. आता यावर पहिल्यांदाच राम कपूरची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने सांगितलं, “ज्यावेळी मला रामने फोन केला होता, तेव्हा मध्यरात्रीचे 2.30 वाजले होते. रामने मला सीनविषयी सर्वकाही सांगितलं, तेव्हा ते ऐकून मला थोडा धक्काच बसला होता. त्यावेळी मी नुकतीत आई बनली होती आणि मध्यरात्री मी माझ्या बाळाला स्तनपान करत होती. त्याचवेळी रामने हे सर्व सांगितलं तेव्हा मी काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी सरळ फोन कट केला होता. परंतु नंतर जेव्हा मी या सगळ्यांचा शांत डोक्याने विचार केला, तेव्हा मला जाणवलं की मी जे केलं ते अजिबात योग्य नव्हतं.”
“त्यावेळी टीव्ही कलाकारांची शिफ्ट 24 ते 48 तासांपर्यंतची असायची आणि राम कामाच्या प्रेशरमुळे काही दिवसांपर्यंत घरी येऊ शकत नव्हता. मला फार वाईट वाटलं होतं. कदाचित ते पहिल्यांदा होतं, म्हणून मला विचित्र वाटलं होतं. परंतु आज मी त्याबद्दल विचार करते तेव्हा असं वाटतं की मी चुकीचं वागले. ते फक्त कलाकार आहेत आणि ते आपलं काम करत आहेत. टीव्ही सेटवर रोमान्ससारखी कोणती गोष्ट नसते, तिथलं वातावरण फार तणावपूर्ण असतं. त्यामुळे असं वागून मी रामला कठीण परिस्थितीत का टाकावं असा विचार केला. त्यामुळे सकाळी शूटिंग संपवून जेव्हा तो घरी आला, तेव्हा मी फक्त त्याला मिठी मारली”, असं तिने स्पष्ट केलं.
या सीनविषयी राम एका मुलाखतीत म्हणाला होता, “अभिनेमा म्हणून माझं जे काम आहे, ते करणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. निर्माती एकता कपूरने तो इंटिमेट सीन लिहिला होता आणि आम्ही तो सीन करावा अशी तिचीच इच्छा होती. मी एकताला विचारलं की, ‘तुला खात्री आहे का?’ कारण ते टेलिव्हिजनवर असं आधी कधीच झालं नव्हतं. टेलिव्हिजनवरील तो पहिला किसिंग सीन होता. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट होती. पण एकता त्या सीनबद्दल खूप कॉन्फीडंट होती. तिला तो सीन मालिकेत दाखवायचा होता. मग मीसुद्धा ठीक आहे म्हणालो.” मात्र या सीनचा परिणाम मालिकेच्या टीआरपीवर झाल्याचं रामने पुढे स्पष्ट केलं. लिपलॉक सीनच्या आधी मालिकेची रेटिंग सहा आणि पाच अशी होती. मात्र त्या इंटिमेट सीननंतर ही रेटिंग थेट दोनवर आली होती.
