
काही दिवसांपूर्वी ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेचा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. या मालिकेतून अभिनेता किरण गायकवाडने दमदार पुनरागमन केलंय. याशिवाय त्यातील इतरही पात्रांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. असंच एक पात्र म्हणजे अप्पांचं. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत अण्णा नाईकांची भूमिका साकारलेले अभिनेते माधव अभ्यंकर यामध्ये अप्पांच्या भूमिकेत आहेत. नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कारण या प्रोमोमध्ये माधव अभ्यंकर हे चक्क नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत थिरकताना दिसून येत आहेत. खरंतर जाईल तिथे गौतमी सर्वांचं लक्ष वेधून घेते. पण या प्रोमोमध्ये माधव अभ्यंकर यांच्यासमोर गौतमीची फिकी पडल्याच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
माधव अभ्यंकर हे आजसुद्धा ‘अण्णा नाईक’ म्हणूनच चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे या प्रोमोच्या व्हिडीओवर अनेकांनी त्यांचा उल्लेख अण्णा नाईक असं करत कमेंट्स लिहिल्या आहेत. ‘अण्णा नाईक फुल फॉर्ममध्ये आहेत’, असं एकाने लिहिलं. ‘अण्णा नाईक जोरात, गौतमी पाटील कोमात’, असं दुसऱ्याने म्हटलंय. तर काहींना यामध्ये शेवंताची कमतरता जाणवली. ‘आता शेवंता रुसेल’, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. ‘देवमाणूस’मध्ये आता शेवंतालाही आणा, अशी मागणी चाहत्यांनी केली.
माधव अभ्यंकर या मालिकेत गोपाळचे वडील हिम्मतराव देशमुखची भूमिका साकारत आहेत. त्यांना मालिकेत सर्वजण अप्पा म्हणून ओळखतात. हिम्मतराव पेशाने पैलवान आणि शेतकरी आहे. जरी आता तो कुस्ती खेळत नसला तरी एका काळात त्याने अनेकांना मातीत लोळवलं आहे. हे अतिशय इरसाल पात्र आहे. रंजना आणि फुलादेवी या अप्पाच्या दोन बायका आहेत. त्याला बायकांबद्दल थोडं जास्त आकर्षण आहे, त्यासाठी त्याने आपली संपत्ती आणि पैसे खर्ची घातलं आहे. हेच आकर्षण या प्रोमोमध्ये स्पष्ट पहायला मिळत आहे.
याआधी माधव अभ्यंकर यांनी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत अण्णा नाईकची भूमिका साकारली होती. ती भूमिका अजूनही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. म्हणूनच ‘देवमाणूस’चा प्रोमो आला तेव्हा ‘अण्णा इज बॅक’ हीच चर्चा सुरू होती. देवमाणूसमधील त्यांच्या या नव्या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय.