Genelia Deshmukh | ऑनस्क्रीन किसिंग सीन्स करण्याबाबत जिनिलिया स्पष्टच बोलली; “तसे सीन्स करताना मी..”

अभिनेत्री जिनिलिया डिसूझाने दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलं. मात्र अभिनेता रितेश देशमुखशी लग्न केल्यानंतर ती फार क्वचित पडद्यावर झळकली. यामुळे रितेशने तिला लग्नानंतर इंडस्ट्रीत काम करण्यापासून रोखल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

Genelia Deshmukh | ऑनस्क्रीन किसिंग सीन्स करण्याबाबत जिनिलिया स्पष्टच बोलली; तसे सीन्स करताना मी..
Genelia D'souza Deshmukh
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 21, 2023 | 1:12 PM

मुंबई | 21 जुलै 2023 : अभिनेत्री जिनिलिया देशमुखने बऱ्याच वर्षांनंतर ‘वेड’ या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेतून पुनरागमन केलं. या चित्रपटात तिने पती रितेश देशमुखसोबत काम केलं होतं. त्यानंतर आता ती ‘ट्रायल पीरिअड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जिनिलियाने जिनिलिया पडद्यावरील किसिंग किंवा इंटिमेट सीन्सविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. पडद्यावर असे सीन्स करणं ती का टाळते, याचंही उत्तर जिनिलियाने या मुलाखतीत दिलं.

किसिंग सीन्सबद्दल काय म्हणाली जिनिलिया?

“मला असं वाटतं की असे सीन करताना मी स्क्रीनवर चांगली दिसणार नाही. कारण ते सीन शूट करताना मी स्वत: कम्फर्टेबल नसेन. मला अभिनयातील अप्रामाणिकपणा ऑनस्क्रीन दाखवायचा नाही. तुम्ही जर एखादी गोष्ट करत असाल तर ती मनापासून करा असं माझं मत आहे. पण जर तुम्ही त्या सीनला पूर्ण न्याय देऊ शकत नसाल तर ते करणं टाळणंच योग्य आहे. माझ्या मते पडद्यावरील इंटिमेट सीन्सच्या वेगवेगळ्या परिभाषा आहेत. प्रत्येक वेळी ते फक्त किसिंग किंवा बोल्ड दृश्यांतूनच स्पष्ट होतं असं नाही. अनेक पुरुषांना पांढरा शर्ट परिधान केलेली मुलगी आवडते. ती पूर्ण कपड्यांमध्ये असतानाही पुरुषांना आकर्षक वाटू शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे आपण एखाद्या चौकटीतूनच पाहणं गरजेचं नाही,” असं ती म्हणाली.

लग्नानंतर अभिनयापासून दूर का गेली?

आणखी एका मुलाखतीत जिनिलियाला लग्नानंतर इंडस्ट्रीपासून दूर राहण्यामागचं कारण विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, “लोक त्यांना जे म्हणायचं असतं ते म्हणतात पण त्यात काही तथ्य नसतं. मी स्वत:हून इंडस्ट्रीपासून दूर गेले, कारण मला माझ्या लग्नानंतरच्या आयुष्याचा पूर्णपणे आनंद घ्यायचा होता. रितेश आणि मुलांसोबत मला वेळ घालवायचं होतं. तू आणखी काम का करत नाहीस, असा सवाल मला आजही अनेकजण विचारतात. पण मला वाटत नाही की मी आणखी काम करू शकेन. मला आजही माझ्या मुलांसोबत आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवायला आवडतं. जेव्हा मला चित्रपटात काम करायची इच्छा होईल, तेव्हा मी स्वत:हून प्रोजेक्ट्स निवडेन.”