
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या निळ्या साडीतल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. इतकंच नव्हे तर नेटकऱ्यांनी तिला ‘नॅशनल क्रश’चा टॅग दिला. रातोरात इंटरनेटवर अशा प्रकारे व्हायरल झाल्यानंतर गिरीजाला असंख्य मेसेज, कॉल्स येऊ लागले होते. परंतु सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत, तसे त्याचे तोटेसुद्धा अनेक आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गिरीजाने याविषयीचा खुलासा केला आहे. “मला आजवर कधी इतके डीएम्स (डायरेक्ट मेसेज) आले नव्हते. त्यातही दोन प्रकार होते. या व्यक्तीचा आदर करावा की तिला सेक्शुअलाइज करावं? लोक तुम्हाला कशा पद्धतीने बघतात, हे पाहणंही खूप रंजक असतं”, असं ती म्हणाली. परंतु सुदैवाने संपूर्ण कुटुंब या इंडस्ट्रीत काम करत असल्याने त्यांना यात काही वेगळं वाटलं नसल्याचं समाधान तिने व्यक्त केलं.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत गिरीजा म्हणाली, “माझ्या कुटुंबातील अनेकजण या इंडस्ट्रीत काम करत असल्याने त्यांना अशा विचित्र कमेंट्सबद्दल किंवा व्हायरल बातम्यांबद्दल काही नवीन वाटलं नाही. कोणाच्याच भावना दुखावल्या नाहीत, उलट प्रत्येकालाच तो ट्रेंड मजेशीर वाटला. माझ्या मुलाने जेव्हा याविषयी विचारलं, तेव्हा मी त्यालाही समजावून सांगितलं की अशा गोष्टींमध्ये काहीच लॉजिक नसतं. ही फक्त एक लाट असते. पण नॅशनल क्रश या टॅगवर मला हसू येतं. कारण त्याने काहीच बदलणार नाहीये. मला काही कामाचे ऑफर्स अधिक येणार नाहीयेत.”
प्रसिद्धीसोबतच गिरीजाला काही नकारात्मक गोष्टींचाही त्रास सहन करावा लागला. अनेकांनी तिचे फोटो मॉर्फ केले. एआयचा वापर करून तिचे फोटो मॉर्फ करण्यात आले आणि ते सोशल मीडियावर पसरवले जाऊ लागले. याविषयी ती पुढे म्हणाली, “काही फोटोंमध्ये माझे कपडे गायब होते, तर काही व्हिडीओंमध्ये मी काहीतरी विचित्र करताना दिसतेय. या गोष्टी इंटरनेटवर कायम राहणार आहे. प्रत्येकाला माहीत आहेत की हे सर्व एडिट केलेले आहे. माझ्या मुलालाही हे समजेल. पण जेव्हा तो बघेल, तेव्हा एका क्षणासाठी का होईना तो विचार करेल. मी पडद्यावर इंटिमेट सीन्स करणं आणि माझे फोटो किंवा व्हिडीओ असे मॉर्फ करणं यात फरक आहे. मी कोणत्या गोष्टी निवडते आणि माझ्या परवानगीशिवाय जे केलं जातंय, त्यात फरक आहे. जर मला एखाद्याचा हात पकडायचा असेल तर त्याचा अर्थ असा नाही की कोणीही माझा हात पकडू शकतो. याबद्दल काहीच न म्हणणं मला योग्य वाटलं नाही. म्हणून मी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून त्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.”
सोशल मीडियावर काही हादरवणारे डीएम्स आल्याचाही खुलासा गिरीजाने यावेळी केला. “एकजण म्हणाला, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, तू मला फक्त एक संधी दे. एकाने तर माझा रेटसुद्धा विचारला. एक तास घालवण्याची किंमत काय आहे? असे असंख्य मेसेजेस होते. जर याच लोकांनी मला खऱ्या आयुष्यात पाहिलं, तर ते मान वर करून बघणारही नाहीत. पडद्याआड लोक काहीही बोलतात आणि तुमच्यासमोर ते प्रेमाने आणि आदराने वागतात. एकंदरीत हा एक विचित्र झोन आहे. या व्हर्चुअल स्पेसला किती गांभीर्याने घ्यावं यावर मोठा वाद होऊ शकतो”, असं मत गिरीजाने मांडलं.