Govinda : भांगेत सिंदूर… तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय ? गोविंदावर पुन्हा भडकली अभिनेत्री, बोचरी पोस्ट
Govinda : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री दिव्या खोसला गोविंदावर भडकल्याचं दिसून आलं होतं. आता तिने पुन्हा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. मात्र तिने कोणाचंही नाव न घेता तिचा मुद्दा मांडला. त

बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) सध्या त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोविंदाचं नावं अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबत जोडलं जात असून त्या दोघांच्या नात्याबद्दल बरंच काही बोललं जात आहे. गणेशोत्सवादरम्यान गोविंदा हा लालबागच्या राजा च्या चरणी दर्शनासाठी आला होता., तेव्हा त्याच्यासोबत कोमलही होती, त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. तेव्हापासूनच दोघांबद्दल आणखी चर्चा सुरू झाली. तेव्हा गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा हिने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कोमलनेही यावर प्रतिक्रिया देत सुनीतावर अनेक आरोप लावले होते. अभिनेत्री दिव्या खोसला कुमारनेही (Divya Khosla Kumar) यावर प्रतिक्रिया देत लांबलचक पोस्ट लिहीली होती. अशातच तिने आज पुन्हा तिच्या इन्स्टा अकाऊंटवर एक मोठी पोस्ट लिहीत गोविंदाच्या या प्रकरणावर मत मांडलं आहे.
ती खाली वाकते आणि भांगेत सिंदूर..
अभिनेत्री दिव्या खोसला कुमारने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र या पोस्टमध्ये दिव्याने कोणातंही नाव न घेता तिचं मत मांडलं आहे. दिव्याने लिहिलं, “ आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात जे काही करतो, ती निश्चितच आपली निवड असते. पण निदान समाज स्वच्छ आणि सुसंस्कृत ठेवण्यासाठी आपण समाजाच्या मर्यादा जपणे अत्यंत आवश्यक आहे. एखादी मुलगी तुमच्यासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाते आणि अशा प्रकारे वाकते की तिच्या भांगेत सिंदूर भरला जातो, ज्यामुळे त्या कपलविषयी बातम्या बनवण्याची संधी मीडियाला मिळते… खरंच… तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात?” असा सवाल तिने विचारला आहे.
सिंदूरचं महत्व समजतं का ?
याच पोस्टमध्ये दिव्याने पुढे लिहीलं, “ आणि त्यानंतर ते तुमच्या पर्सनल आयुष्यातील खासगी गोष्टींवर टिप्पणी करतात. हा एखादा विनोद आहे असं तुम्हाला खरंच वाटतं का ? निदान आपल्या स्वतःच्या अजेंड्यासाठी आपल्या धर्माचा वापर करणं तरी बंद करा. तुम्हाला सिंदूराचं महत्त्व तरी समजतं का ? सिंदूर म्हणजे विवाहित हिंदू स्त्रीच्या वैवाहिक जीवनाचे सर्वात प्रभावशाली प्रतीक मानलं जातं… अशा प्रकारच्या कृत्यांना पाठिंबा देणाऱ्या सेलिब्रिटींमुळे खरोखरच खूप निराशा झाली” अशा शब्दांत दिव्याने तिची नाराजी व्यक्त केली.

याआधीही लिहीली होती पोस्ट
यापूर्वीही दिव्या खोसलाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली होती. “ मी इतक्या साऱ्या गोष्टी पाहत्ये की त्या मनातच ठेवता आल्या नाहीत. आपल्या समाजात पूर्वी महिलांना पुरुषांचं ‘मजूर’ समजलं जायचं. अनेक वर्षे आपल्या पणजी- आजी यांनी आपल्या मुलींना स्वतंत्र बनवण्यासाठी, त्यांना शिक्षण देण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी खूप मेहनत घेतली, जेणेकरून महिलांना पुरुषांच्या हाताखाली काम करणाऱ्या राहावे लागू नये. पण अलीकडे सोशल मीडियावर जे काही घडत आहे, त्यामुळे माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत ” असं तिने म्हटलं होतं.
त्यासोबतच तिने गोविंदाचं नाव घेत बरंच काही सुनावलं. तसंच सुनीता अहुजा यांना सपोर्टही दर्शवला होता. तिची ही पोस्ट बरीच चर्चेत होती. त्यानंतर आता तिने पुन्हा एकदा पोस्ट लिहीत या मुद्यावर भाष्य केलं आहे.
