Hanuman Ansh: पापाचे भागीदार.., हात जोडून ‘हनुमान अंश’ फेम अभिनेत्याची विनंती; तरी भडकले नेटकरी; म्हणाले ‘स्वत:ला देव मानतोय’

Hanuman Ansh: 'हनुमान अंश'च्या पायरेसीबाबत अभिनेता शोभिनव सत्याने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. मात्र या व्हिडीओत त्याने वापरलेल्या 'पापाचे भागीदार' या शब्दावरून नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Hanuman Ansh: पापाचे भागीदार.., हात जोडून हनुमान अंश फेम अभिनेत्याची विनंती; तरी भडकले नेटकरी; म्हणाले स्वत:ला देव मानतोय
अभिनेता शोभिनव सत्या
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 07, 2026 | 9:08 AM

Hanuman Ansh: ‘हनुमान अंश’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवरील दमदार कामगिरीमुळे चर्चेत आहे. मात्र, या यशाच्या काळात चित्रपटाचा मुख्य अभिनेता शोभिनव सत्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. चित्रपटाची पायरेटेड कॉपी ऑनलाइन पाहू नका, अशी विनंती करणारा त्याचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. मात्र, या अपीलसोबत केलेल्या ‘पाप’च्या उल्लेखावर काही नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला. शोभिनव सत्याने ऑगस्टमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये त्याने ‘हनुमान अंश’ला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले होते. त्याचवेळी चित्रपटाची पायरेटेड आवृत्ती मोबाइल आणि टीव्हीवर पाहिली जात असल्याबद्दल त्याने चिंता व्यक्त केली.

निर्मात्यांनी चित्रपट अधिकृतपणे इंटरनेटवर प्रदर्शित केलेला नसताना काही लोक तो बेकायदेशीर पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देत असल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे अशा माध्यमातून चित्रपट पाहणारे प्रेक्षकही दुसऱ्याच्या चुकीत सहभागी होत असल्याचं त्याने म्हटलं होतं. त्याचा मुख्य उद्देश प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहावा आणि पायरेसीला प्रोत्साहन देऊ नये, हा होता. शोभिनवने या व्हिडीओमध्ये चित्रपटाच्या पायरेटेड कॉपीविरोधात टीमकडून करण्यात आलेल्या कारवाईचीही माहिती दिली होती. त्यानुसार, निर्मात्यांच्या टीमने चित्रपटाच्या पायरेटेड आवृत्तीच्या 600 ते 700 लिंक हटवल्या होत्या. मात्र, पायरेसीचा निषेध करताना ‘पापाचे भागीदार’ असा उल्लेख केल्याने काही सोशल मीडिया युजर्स नाराज झाले.

Loading...

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

काही नेटकऱ्यांनी अभिनेता स्वतःला धार्मिक व्यक्तिरेखेशी जोडून पाहत असल्याची टीका केली. तर काहींनी पायरेसीविरोधातील त्याचा मुद्दा योग्य असल्याचं मान्य केलं, मात्र त्यासाठी धार्मिक किंवा नैतिक भाषेचा वापर करण्याची गरज नसल्याचं म्हटलं. त्यामुळे व्हिडीओचा मूळ हेतू पायरेसीविरोधात असला तरी सोशल मीडियावर चर्चा मात्र त्याच्या शब्दांभोवती रंगली.

‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई

विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित ‘हनुमान अंश’ हा नीम करोली बाबा यांच्या जीवनावर प्रेरित आध्यात्मिक चित्रपट आहे. शोभिनव सत्याने यात नीम करोली बाबांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. सुरुवातीला चित्रपटाची कमाई फारशी प्रभावी नव्हती; मात्र सकारात्मक माऊथ पब्लिसिटीमुळे नंतर चित्रपटाने वेग पकडला. या चित्रपटाने भारतात 300 कोटींचा टप्पा पार केला असून जगभरातील कमाईही 400 कोटींच्या पुढे गेली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us