Har Har Mahadev: “यापुढे बापजन्मात ऐतिहासिक बायोपिक करणार नाही”; सुबोध भावेनं जोडले हात

'हर हर महादेव'च्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुबोध भावेचा मोठा निर्णय; "इथून पुढे कोणताही बायोपिक करणार नाही"

Har Har Mahadev: यापुढे बापजन्मात ऐतिहासिक बायोपिक करणार नाही; सुबोध भावेनं जोडले हात
Subodh Bhave
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Dec 18, 2022 | 12:48 PM

कोल्हापूर: ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरून सुरू झालेला वाद अद्यापही शमला नाही. संभाजीराजे छत्रपती यांनी चित्रपटात दाखवलेल्या इतिहासावर आक्षेप नोंदवत जोरदार टीका केली होती. त्यानंतर सोशल मीडियावरही चित्रपटाला विरोध झाला. आता झी मराठी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याने पुन्हा वाद चर्चेत आला. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील काही शिवभक्तांनी अभिनेता सुबोध भावेची भेट घेतली. या भेटीदरम्यान आणि हर हर महादेव या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादादरम्यान सुबोधने मोठा निर्णय घेतला आहे.

या चित्रपटात सुबोधने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला असून त्यातील काही उल्लेख आणि दृश्ये काढून टाकावेत, अशी मागणी शिवभक्तांनी केली. यावेळी त्यांच्याशी बोलताना सुबोधने भविष्यात कोणताही ऐतिहासिक बायोपिक करणार नसल्याची भूमिका मांडली.

“आता शूटिंग सुरू असलेला शेवटचा बायोपिक असेल”

“छत्रपती शिवाजी महाराजांवरील माझं प्रेम आयुष्यभर राहील. त्यांच्या चित्रपटातून मला जे काही मिळालं, ते मी मरेपर्यंत करत राहणार. पण यापुढे ऐतिहासिक चित्रपटातील भूमिका बापजन्मात करणार नाही. आता शूटिंग सुरू असलेला शेवटचा बायोपिक असेल”, असं म्हणत सुबोधने शिवभक्तांसमोर हात जोडले.

आज (रविवार) झी मराठी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला. “राज्य सरकारला मी पत्र पाठवणार आहे. त्यांनी इतिहासकारांची एक स्वतंत्र समिती स्थापन करावी. त्याचे प्रोटोकॉल सेट करावेत. पहिलं महाराष्ट्रात स्क्रिनिंग होऊन नंतर केंद्राच्या समितीकडे चित्रपट पाठवावा. कारण आम्हाला केंद्राच्या समितीवर विश्वास नाही. तिथं कोण इतिहासकार बसलेत त्याची आम्हाला कल्पना नाही,” असं ते म्हणाले.