
छोट्या किंवा मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना अनेकदा कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडतात. मालिका किंवा चित्रपटाच्या सेटवर असंख्य जोड्या तयार झाल्या आहेत. त्यापैकी काहींचं प्रेम लग्नापर्यंत पोहोचलं, तर काहींचे मार्ग एका ठराविक काळानंतर वेगळे झाले. असाच एक अभिनेता त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिला आहे. या अभिनेत्याने टीव्ही इंडस्ट्रीत बरंच नाव कमावलंय. अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून हर्षद अरोरा आहे. जो सध्या ‘हाल-ए-दिल’ या मालिकेत अभिनेत्री मनीषा राणीसोबत भूमिका साकारतोय.
हर्षद सध्या विवाहित असून गर्लफ्रेंड मुस्कान राजपूतशी त्याने लग्न केलंय. परंतु एकेकाळी त्याचं नाव टीव्ही अभिनेत्री अपर्णा कुमारशी जोडलं गेलं होतं. हे दोघं जवळपास पाच वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका मालिकेत अपर्णाने हर्षदच्या आईची भूमिका साकारली होती. या ऑनस्क्रीन मायलेकाच्या जोडीचं जेव्हा एकमेकांवर प्रेम जडलं, तेव्हा त्याबद्दल ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. 2017 मध्ये हर्षद आणि अपर्णाची पहिल्यांदा भेट झाली होती. या दोघांनी ‘मायावी मलंग’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. मालिकेत काम करताना दररोज दहा ते बारा तास कलाकार एकमेकांसोबत वेळ घालवतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्यात कधी चांगली मैत्री किंवा रिलेशनशिप निर्माण होतं.
‘मायावी मलंग’ या मालिकेच्या सेटवर आधी हर्षद आणि अपर्णा यांची चांगली मैत्री झाली होती. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. ब्रेकअपनंतर 2022 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत हर्षद या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. अपर्णासोबतचं नातं फार काळ टिकू न शकल्याबद्दल त्याने पश्चात्ताप व्यक्त केला होता.
हर्षदने 2013 मध्ये कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय ‘बेइंतेहा’ या मालिकेतून पदार्पण केलं होतं. या मालिकेत त्याने साकारलेली झैन अब्दुल्लाहची भूमिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर स्टार प्लसवरील ‘दहलीज’ या मालिकेत त्याने आयएएस अधिकारी आदर्श सिन्हाची भूमिका साकारली होती. 2015 मध्ये त्याने ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी 6’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.