संजय लीला भन्साळींची पहिलीवहिली वेब सीरिज; ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’चा थक्क करणारा फर्स्ट लूक

| Updated on: Feb 01, 2024 | 11:25 AM

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची पहिली वेब सीरिज 'हिरामंडी : द डायमंड बाजार'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. या सीरिजमध्ये कलाकारांची मोठी फौज पहायला मिळतेय. मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मिन सेगल या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

संजय लीला भन्साळींची पहिलीवहिली वेब सीरिज; हिरामंडी : द डायमंड बाजारचा थक्क करणारा फर्स्ट लूक
Heeramandi
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 1 फेब्रुवारी 2024 | आपल्या चित्रपटांमधून ‘लार्जर दॅन लाईफ’चा अनुभव प्रेक्षकांना देणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी वेब विश्वात पदार्पण केलं आहे. त्यांची पहिलीवहिली वेब सीरिज ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’ नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्याचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या वेब सीरिजमध्येही भन्साळींची खास स्टाइल दिसून येत आहे. मोठमोठे सेट्स, कलाकारांचे भरजरी कपडे या फर्स्ट लूकमध्ये लक्ष वेधून घेतात. या सीरिजमध्ये मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख, शर्मिन सेगल यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रेम, ताकद, सूड आणि स्वातंत्र्याची एक महाकाव्य गाथा म्हणून ‘हिरामंडी : द डायमंड बाजार’चा उल्लेख केला जात आहे. या प्रोजेक्टवर भन्साळी गेल्या 14 वर्षांपासून काम करत आहेत.

काय आहे हिरामंडीची कथा?

‘हिरामंडी’ हा पाकिस्तानमधील लाहोर स्थित रेडलाइट एरिया आहे. एकेकाळी तो ‘शाही मोहल्ला’ म्हणून ओळखला जायचा. देशाच्या विभाजनापूर्वी ‘हिरामंडी’च्या वेश्या त्याकाळी प्रचंड चर्चेत होत्या. राजकारण, प्रेम आणि फसवणूक या सर्व गोष्टी त्याकाळी कोठ्यावर पहायला मिळायच्या. मुघल काळात अफगाणिस्तान आणि उजबेकिस्तानच्या महिलासुद्धा हिरामंडीमध्ये रहायला आल्या होत्या. त्याकाळी वेश्या या शब्दाला घाणेरड्या नजरेनं पाहिलं जात नव्हतं. तेव्हाच्या वेश्या या संगीत, कला, नृत्य यांच्याशी अधिक जोडल्या गेल्या होत्या. त्या काळातील वेश्या फक्त राजा-महाराजांच्या मनोरंजनासाठी काम करायच्या.

हे सुद्धा वाचा

पहा फर्स्ट लूक

जसजसा काळ बदलत गेला, तसं मुघल शासन संपत गेलं आणि हिरामंडीवर परकीयांनी आक्रमण केलं. ब्रिटिशांच्या काळात हिरामंडीची चमक फिकी पडू लागली होती. इंग्रजांच्या काळात फिकी पडलेली हिरामंडीची चमक पुन्हा कधीच परतली नाही. स्वातंत्र्यानंतर सरकारने तिथे राहणाऱ्यांसाठी काही चांगले उपाय केले, मात्र त्यानेही काही फरक पडला नाही.

संजय लीला भन्साळी हे सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्याच्या चित्रपटातील प्रत्येक दृश्यात कलेचा उत्कृष्ट नमुना पहायला मिळतो. त्यामुळे ‘हिरामंडी’कडूनही प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. ही वेब सीरिज कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही.