
गेले दोन दिवस ब्रीच कँडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेतल्यानंतर बुधवारी सकाळी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना घरी पाठवण्यात आलं. त्यांच्यावर पुढील उपचार घरीच करण्यात येणार असल्याची माहिती देओल कुटुंबीयांनी दिली. डॉक्टर प्रतित समदानी यांनीही कुटुंबीयांच्या आग्रहास्तव त्यांना घरी पाठवण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. 89 वर्षीय धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल विविध चर्चा होत असताना देओल कुटुंबीयांनी एक निवेदन जारी करून गोपनीयतेची विनंती केली. त्याचप्रमाणे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगत त्यांनी चाहत्यांना आश्वस्त केलं. धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यासाठी हा काळ सोपा नव्हता, असं त्या म्हणाल्या.
“गेले काही दिवस माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या फार कष्टाचे होते. धर्मेंद्रजींच्या प्रकृतीची आम्हा सर्वांनाच खूप काळजी आहे. त्यांच्या मुलांची तर झोपच उडाली आहे. अशा कठीण काळात मी कमकुवत होऊ शकत नाही, कारण माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. पण होय, ते घरी आल्यामुळे मी खुश आहे. ते रुग्णालयातून बाहेर पडले, याचा आम्हाला दिलासा आहे. जे लोक त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्यासोबत त्यांनी राहणं गरजेचं आहे. बाकी तर सर्व देवाच्याच हातात आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा”, अशा शब्दांत हेमा मालिनी व्यक्त झाल्या.
जुहू इथल्या निवासस्थानी परतल्यानंतर धर्मेंद्र यांची अभिनेते अमिताभ बच्चन यांनी भेट घेतली. 83 वर्षीय बिग बी स्वत: कार चालवत धर्मेंद्र यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. धर्मेंद्र यांचे चुलत भाऊ आणि ‘जिद्दी’ चित्रपटाचे दिग्दर्शक गुड्डू धनोवा हेसुद्धा त्यांना भेटायला निवासस्थानी गेले होते. त्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “मी एवढचं सांगू शकतो की ते ठीक आहेत. यापेक्षा मी फार काही सांगू शकत नाही.” ‘अपने’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनीसुद्धा धर्मेंद्र यांची भेट घेतली. “ते घरी परतले आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी आपण सर्वांनी प्रार्थना केली पाहिजे. ते हिरो आहेत, लढवय्ये आहेत आणि ते लवकरच ठीक होतील”, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.