
मुंबई | 6 डिसेंबर 2024 : झगमगत्या विश्वातून एक धाक्कादायक बातमी समोर येत आहे. विमान अपघातात एका प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं आहे. भयानक अपघातात अभिनेत्याच्या दोन लहान मुलींनी देखील त्यांचे प्राण गमावले आहेत. अभिनेता आणि दोन मुलींच्या निधनाची माहिती समोर येताच कुटुंबाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ज्या अभिनेत्याचं विमान अपघातात निधन झालं आहे, तो दुसरा तिसरी कोणी नाही तर, हॉलिवूड अभिनेता क्रिश्चियन ओलिव्हर आहे. क्रिश्चियन ओलिव्हर 51 वर्षांचा होता. अभिनेत्याचे विमान कॅरेबियन बेटाजवळ समुद्रात कोसळले आणि दुर्घटना घडली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विमान अपघातात निधन झालेल्या अभिनेत्याची आणि त्याच्या दोन मुलींची चर्चा रंगली आहे.
झालेल्या विमान अपघातात रॉबर्ट सॅक्स नावाच्या विमानाचा मालक आणि पायलट यांचाही मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगल इंजिन असलेल्या विमानाने गुरुवारी दुपारी बेकिया येथील जेएफ मिशेल विमानतळातून उड्डान घेतलं होतं. जवळच्या सेंट लुसियाकडे जात असताना मोठा अपघात झाला.
अपघातात निधन झालेल्या अभिनेत्याच्या मुलींची नावे देखील समोर आली आहेत. मदिता क्लेप्सर (12) आणि एनिक क्लेप्सर (10) अशी अभिनेत्याच्या मुलींची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘उड्डान घेतल्यानंतर विमानाला काही अडचणींचा सामना करावा लागला आणि विमान समुद्रात पडला. पगेट फार्ममधील मच्छीमार मदतीसाठी त्यांच्या बोटीतून घटनास्थळी धावत आले. तेव्हा चारही मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.’
सध्या संबंधीत घटनेची अधिक चौकशी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पायलटने टेकऑफनंतर लगेच टॉवरवर रेडिओवर अडचणीत असल्याचा मेसेज पाठवला होता. तोच पायलटचा शेवटचा संदेश ठरला… अभिनेत्यासह दोन मुली आणि पायलटचा देखील मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
अभिनेता क्रिश्चियन ओलिव्हर याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं होतं. ऑलिव्हरने नुकताच 20 डिसेंबर रोजी बाई लिंग अभिनीत आणि निक लियॉन दिग्दर्शित, फॉरएव्हर होल्ड युवर पीस या सिनेमात त्याचे अंतिम सीन शूट केले होते. आता अभिनेत्याच्या निधनानंतक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.