त्या रात्री मी देवाकडे मृत्यू मागितला..; हनी सिंहची होती अशी अवस्था, आई 24 तास गात होती आरती
हनी सिंहने स्वत: एका मुलाखतीत खुलासा केला होता की, जेव्हा तो अति प्रमाणात ड्रग्जचं सेवन करत होता, तेव्हा शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांनी त्याला त्यापासून सावध केलं होतं. व्यसनामुळे तो पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतो अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली होती.

रॅपर हनी सिंहने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. 2014 मध्ये एक काळ असा होता, जेव्हा चित्रपट आणि सिंगल म्युझिक व्हिडीओ हे ‘यो यो हनी सिंह’च्या रॅपशिवाय अपूर्ण वाटत होते. ‘सनी सनी’, ‘आता माझी सटकली’, ‘मनाली ट्रान्स’, ‘चार बोतल’ यांसारखी त्याची गाणी खूप गाजली. आजही तरुणाईमध्ये ही गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत. मात्र त्याच्या काही वर्षांनंतर हनी सिंह इंडस्ट्रीतून पूर्णपणे गायब झाला होता. ब्रेकनंतर तो जेव्हा पुन्हा प्रकाशझोतात आला, तेव्हा त्याला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. हनी सिंहने खुलासा केला होता की, तो बायपोलर डिसॉर्डरशी झुंज देत होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो त्याच्या आयुष्यातील या सर्वांत कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.
‘एबी टॉक्स’ पॉडकास्ट मुलाखतीत हनी सिंहने सांगितलं, “मी यो-यो हनी सिंह होतो, त्यावेळचा सर्वांत मोठा सुपरस्टार. परंतु एक वेळ अशी आली, जेव्हा माझ्यात बायपोलर डिसॉर्डरची लक्षणं दिसू लागली. जर मी दहा वर्षांपूर्वीचं बोलू लागलो तर मी स्वत:ला एका खोलीत बंदिस्त करून ठेवत होतो, कोणाशीच बोलत नव्हतो, कोणालाच भेट नव्हतो. इंटरनेटपासूनही मी दूर गेलो होतो. मी रेडिओ ऐकत नव्हतो, टीव्ही बघत नव्हतो आणि मीडियापासून स्वत:ला खूप दूर ठेवलं होतं. या सर्व गोष्टी माझ्यावर हावी होत होते, मला नियंत्रित करत होते. बायपोलर डिसॉर्डर हा एक असा आजार आहे, ज्याचं शब्दांत वर्णन करता येत नाही. त्याची सुरुवात प्रत्येक गोष्टीवर शंका घेण्याने, मृत्यूची भीती वाटण्याने आणि लोकांची भीत वाटण्याने होते.”
आपल्या कठीण काळाबद्दल हनी सिंह पुढे म्हणाला, “मला वाटायचं की मीच यो यो हनी सिंहला घडवलं आहे. सगळं काही मीच केलं आहे. मला ती रात्र अजूनही आठवते, जेव्हा मी पूर्णपणे बदललो होतो. माझ्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा मी देवाचा अनादर केल्याबद्दल माफी मागितली. त्याच्यावर विश्वास न ठेवल्याबद्दल मी माफी मागितली. मी म्हणालो, तू कोणीही असशील, कसाही दिसत असशील, मी तुझा नेहमीच आदर करीन, पण मला तुझ्याकडून फक्त एकच गोष्ट हवी आहे. ती म्हणजे मृत्यू.. माझ्या आत जे काही चाललं होतं, त्यावर माझंच नियंत्रण नव्हतं. मी स्वत:लाच कंटाळलो होतो. त्या रात्री मी देवाकडे फक्त मृत्यूच मागितला.”
या सर्व गोष्टींचा सामना करताना त्याच्या कुटुंबीयांनी त्याला बरं करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी त्याची देवावरील श्रद्धा दृढ करण्याचा प्रयत्न केला. हनी सिंहला थोडं तरी बरं वाटावं यासाठी त्याची आई दिवसाचे 24 तास देवाची आरती लावत असे. पण या सर्वांचाही त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. “मी सर्व आशा गमावली होती. मी एका नवीन डॉक्टरला भेटलो आणि त्यांनी माझी औषधं बदलली. तेव्हापासून आतापर्यंत ते खरंच माझ्या आयुष्यात एका देवदूतासारखे आहेत”, असा खुलासा हनी सिंहने केला.