Housefull 5 OTT Release: थिएटर्सनंतर ओटीटीवर असेल ‘हाऊसफुल 5’चा ताबा; कधी अन् कुठे होणार स्ट्रीम?
'हाऊसफुल 5' हा मल्टी स्टारर कॉमेडी चित्रपट सध्या थिएटरमध्ये गाजतोय. लवकरच तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करणाऱ्या या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दलच्या जोरदार चर्चा आहेत. हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार, ते पाहुयात..

जून महिन्याच्या सुरुवातीला निर्माता साजिद नाडियादवालाचा ‘हाऊसफुल 5’ हा कॉमेडी चित्रपट जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची धमाकेदार कमाईसुद्धा सुरू आहे. परंतु प्रेक्षक-समीक्षकांकडून या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अशातच ‘हाऊसफुल 5’च्या ओटीटी रिलीजचीही जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार, याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 6 जून रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडली. त्यानंतर हळूहळू कमाईच्या आकड्यातही वाढ पहायला मिळाली. असे अनेक प्रेक्षक आहेत, जे चित्रपटांच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत असतात. थिएटरमध्ये चित्रपट बघायला वेळ मिळाला नसेल किंवा घरी बसल्या अथवा मोबाइलवर हा चित्रपट पहायचा असेल, तर अशा प्रेक्षकांसाठी ओटीटी रिलीजची माहिती समोर आली आहे. या कॉमेडी चित्रपटाचे डिजिटल राइट्स (डिजिटल हक्क) ॲमेझॉन प्राइम व्हिडीओकडे आहेत.
‘हाऊसफुल 5’ हा चित्रपट थिएटरनंतर थेट ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे. परंतु या स्ट्रीमिंगची तारीख अद्याप अधिकृतरित्या जाहीर झाली नाही. परंतु जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होऊ शकतो. जर एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असेल तर त्याच्या ओटीटी स्ट्रीमिंगसाठी जवळपास 45 ते 60 दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. असंच काहीसं सध्या ‘हाऊसफुल 5’च्या बाबतीत आहे. सध्या या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजला 19 दिवसांचा कालावधी बाकी आहे.
‘हाऊसफुल 5’ने भारतात 188 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात कमाईचा आकडा 244 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या चित्रपटाचं बजेट 200 कोटी रुपये असल्याचं कळतंय. निर्माते साजिद नाडियादवाला यांच्या या बहुचर्चित कॉमेडी फ्रँचाइजीमध्ये पुन्हा एकदा कलाकारांची मांदियाळी पहायला मिळाली. कॉमेडीसोबतच यंदा कथेत मर्डर मिस्ट्रीचीही फोडणी घालण्यात आली आहे. त्यावरही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी दोन-दोन क्लायमॅक्स (हाऊसफुल 5A आणि हाऊसफुल 5B) प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, नाना पाटेकर, रितेश देशमुख आणि त्यांसारख्या सुमारे आणखी डझनभर कलाकारांच्या भूमिका आहेत.
