सलमानसोबत ब्रेकअपनंतर कशी होती ऐश्वर्याची अवस्था? 21 वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचं नातं बॉलिवूड इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेत राहिलं. या दोघांचा ब्रेकअप अत्यंत वाईट होता. त्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या सेटवर कशी यायची, त्यावेळी तिची अवस्था काय होती, याविषयी सहअभिनेत्रीने खुलासा केला आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक कलाकार सेटवर काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले. काहींचं नातं सेटवरून पुढे जात लग्नापर्यंतही पोहोचतं, तर काहींचं नातं फार काळ टिकू शकत नाही. असं असलं तरी इंडस्ट्रीत अशी अनेक जोडपं आहेत, ज्यांच्या नात्यांच्या चर्चा आजही होतात. अशीच एक जोडी म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या सेटवर सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांची लव्ह-स्टोरी त्यावेळी तुफान चर्चेत होती. मात्र जितकी चर्चा त्यांच्या अफेअरची झाली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या ब्रेकअपची झाली. सलमान आणि ऐश्वर्या यांच्यात पुढे खूप वाद झाले होते. यावर आता अभिनेत्री सादिया सिद्दिकीने काही खुलासे केले आहेत. सादियाने ऐश्वर्यासोबत 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शब्द’ या चित्रपटात काम केलं होतं.
सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर वैयक्तिक आयुष्यात कठीण काळातून जाऊनही ऐश्वर्या ‘शब्द’ या चित्रपटाच्या सेटवर अत्यंत शांत आणि प्रोफेशनल वागली, असं सादियाने सांगितलं. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सादिया म्हणाल्या, “ऐश्वर्याने तिच्या वैयक्तिक समस्यांचा सेटवरील कामावर कधीही परिणाम होऊ दिला नाही. ती सेटवर संपूर्ण तयारीने आणि कामाप्रती अत्यंत समर्पित भावनेनं यायची.” ऐश्वर्या आणि सलमानची लव्हस्टोरी ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. यानंतर त्यांच्या लग्नाच्याही अफवा पसरू लागल्या. मात्र 2002 मध्ये ऐश्वर्याने स्वत:च सलमानसोबत ब्रेकअप झाल्याचं सांगितलं.
2003 मध्ये हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं, जेव्हा ऐश्वर्या रायसोबतच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान अभिनेता विवेक ओबेरॉयने पत्रकार परिषद घेत सलमानवर थेट आरोप केले होते. ‘शब्द’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक घटना घडत होत्या, पण तिने त्याचा कामावर कधीच परिणाम होऊ दिला नाही. सादियाने याविषयी पुढे सांगितलं, “त्या चित्रपटात माझा आणि ऐश्वर्याचा एकही स्वतंत्र शॉट नव्हता, तरीही मी दुरून तिचं निरीक्षण केलं. मी जे काही पाहिलं, त्यावरून असं वाटलं की तिने हे सर्व खूप चांगल्या प्रकारे लपवलं होतं. ती नेहमीच सेटवर तयारी करून यायची, तिला तिचे सर्व डायलॉग्स पाठ असायचे, ती पटकथा पूर्णपणे वाचायची आणि अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने तिचं काम पूर्ण करायची.”
‘शब्द’ हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. लीना यादव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. यामध्ये संजय दत्त, ऐश्वर्या राय आणि झायेद खान यांच्या मुख्य भूमिका होत्या.