Disha Patani : 2500 सीसीटीव्ही अन् लाल चप्पल.. पोलिसांनी कसा केला दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांचा एन्काऊंटर

Disha Patani House Firing: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली इथल्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला. हा एन्काऊंटर कसा झाला, आरोपींवर थेट गोळ्या का झाडल्या, त्यांचं लोकेशन कसं मिळालं.. याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या..

Disha Patani : 2500 सीसीटीव्ही अन् लाल चप्पल.. पोलिसांनी कसा केला दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांचा एन्काऊंटर
दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांचं एन्काऊंटर
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 18, 2025 | 9:27 AM

Disha Patani House Firing: अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन गुन्हेगारांचा स्पेशल टास्क फोर्सकडून (STF) एन्काऊंटर करण्यात आला. उत्तर प्रदेशातील बरेली इथल्या दिशा पटानीच्या घरावर दोन अज्ञातांनी गोळीबार केला होता. या आरोपींचा एन्काऊंटर उत्तर प्रदेश एसटीएफ, हरियाणा पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं संयुक्तपणे केला आहे. एसटीएफचे एएसपी राजकुमार मिश्रा यांनी या एन्काऊंटरबाबतची माहिती दिली. पोलिसांनी जवळपास 2500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले आणि एका आरोपीच्या लाल बुटांमुळे त्यांना महत्त्वाचा सुगावा मिळाला. या छोट्याशा तपशीलामुळे पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचता आलं.

‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “टीमवर्क आणि गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने आम्ही ही संपूर्ण कारवाई केली. दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे पोलीस त्या आरोपींचा पाठलाग करत होते. सीसीटीव्ही फुटेज, गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेली माहिती आणि त्यांचे मागील रेकॉर्ड बारकाईने तपासण्यात आले. त्याचवेळी एजन्सींना कळलं की गोळीबार करणारे दोन्ही आरोपी हरियाणातील सोनीपत आणि रोहतकचे रहिवासी होते.”

“रोहतकचा रवींद्र उर्फ कल्लू आणि सोनीपतचा अरुण हे बरेलीला पोहोचणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जेव्हा त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी थेट पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तर देण्यासाठी एसटीएफनेही गोळीबार केला आणि त्यात दोघं आरोपी गंभीर जखमी झाले होते. त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं”, अशी माहिती त्यांनी दिली. या चकमकीत चार पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. दिशाच्या घरावर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी गोल्डी ब्रारच्या गँगचे सदस्य होते.

पोलिसांनी एन्काऊंटरच्या ठिकाणाहून एक ग्लॉक पिस्तूल, एक झिगाना पिस्तूल, अनेक जिवंत काडतुसं आणि एक पांढरी अपाचे मोटरसायकल जप्त केली. गोळीबार करणारे आरोपी पांढऱ्या अपाचेवर आल्याची माहिती दिशाच्या वडिलांनी चौकशीदरम्यान दिली होती. ही कारवाई शहरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटित गुन्हेगारी नेटवर्कला उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. या कारवाईनंतर स्थानिक पोलिसांनी बरेली आणि आसपासच्या भागात सुरक्षाव्यवस्था कडक केली आहे.

कुख्यात गुंड गोल्डी ब्रार गँगने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट करत दिशाच्या घरावरील गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. या गँगशी संबंधित असलेल्या रोहित गोदाराच्या आयडीवरून पोस्ट केलेल्या या पोस्टमध्ये म्हटलं होतं, ‘दिशाची बहीण खुशबू पटानीने स्वामी अनिरुद्धाचार्य आणि स्वामी प्रेमानंद यांच्याबद्दल केलेल्या कमेंटमुळे संतापल्याने गँगकडून हा गोळीबार करण्यात आला आहे.’ भविष्यात असं पुन्हा घडलं तर हत्येसारखी कारवाई केली जाईल, अशी धमकीही या पोस्टमध्ये देण्यात आली होती.