Hrithik Roshan: हे खरंच मूर्खांचं जग.. सकाळीच हृतिक रोशनची विचित्र पोस्ट, नेटकरी पेचात!

Hrithik Roshan: त्याच्या शब्दांचा नेमका अर्थ काय, तो कोणत्या अनुभवातून हे विचार मांडत आहे, असे प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. हृतिकने हे जग मूर्खांचं आहे, असं का म्हटलंय, असा सवाल नेटकरी करत आहेत.

Hrithik Roshan: हे खरंच मूर्खांचं जग.. सकाळीच हृतिक रोशनची विचित्र पोस्ट, नेटकरी पेचात!
Hrithik Roshan
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 30, 2026 | 12:35 PM

Hrithik Roshan: बॉलिवूडचा हँडसम हंक आणि लोकप्रिय अभिनेता हृतिक रोशन त्याच्या अभिनयासोबतच फिटनेस आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळेही चर्चेत असतो. त्याच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचं लक्ष असतं. आता हृतिकने शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. आयुष्य, ज्ञान, शहाणपण आणि आध्यात्मिकतेबद्दल त्याने मांडलेले विचार वाचून चाहतेही संभ्रमात पडले आहेत. विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये त्याने जगाला ‘मूर्खांचं जग’ असं म्हटलं आहे. त्यामुळे हृतिकने सकाळी सकाळी अशी पोस्ट का केली, नेमकं त्याला झालंय तरी काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

काय आहे हृतिक रोशनची पोस्ट?

हृतिक रोशनने 30 ऑक्टोबर रोजी सकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने आयुष्यातील ज्ञान आणि अज्ञान यांच्यातील नात्यावर भाष्य केलं आहे. माणूस आपल्या आयुष्याचा मोठा भाग शहाणपण, ज्ञान आणि स्पष्टता मिळवण्याच्या प्रयत्नात घालवतो. मात्र, या सगळ्याचा शोध घेतल्यानंतर त्याला एक वेगळीच जाणीव होते, असं हृतिकने आपल्या पोस्टमधून सूचित केलं आहे. त्याने लिहिलंय, ‘तुम्ही तुमच्या आयुष्याचा बराचसा काळ शहाणपण आणि स्पष्टतेच्या शोधात घालवता. मात्र, अखेरीस एक गोष्ट लक्षात येते की, अज्ञानातच खरं सुख होतं. हे खरंच मूर्खांचं जग आहे आणि कदाचित हे जग त्यांचंच आहे. कदाचित शहाणपणाची शेवटची पायरी किंवा आध्यात्मिकतेचा अंतिम टप्पा म्हणजे जाणीवपूर्वक एक पाऊल मागे घेणं आणि पुन्हा एकदा त्याच अज्ञानाच्या अवस्थेत, त्या मूर्खपणाकडे परत जाणं. शुभ सकाळ.’

Loading...

पहा पोस्ट-

या विधानाचा अर्थ असा लावला जात आहे की, प्रत्येक गोष्टीचा अति विचार करणं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणं आणि सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीत माणूस स्वतःचा आनंद गमावू शकतो. कधीकधी प्रत्येक गोष्ट समजून घेण्यापेक्षा काही गोष्टी सहजपणे स्वीकारणं अधिक महत्त्वाचं असतं. मात्र, हृतिकने ही पोस्ट नेमकी कोणत्या संदर्भात लिहिली आहे, याबाबत त्याने कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. हृतिकच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us