नवनाथचा जीव केवढा… बोलतो केवढा… तो माझा मित्रच नाही, निलेश राणेंनी फटकारले
निलेश राणे यांनी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बन यांना 'माझा मित्र नाही' असे स्पष्ट करत, त्यांचा 'जीव किती आणि बोलतो किती' असे राणे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यावर झालेल्या टीकेचे खंडन करत, राणे यांनी पक्षांतर्गत वाद टाळण्याचे आवाहन केले.

शिंदे गटाचे आमदार निलेश राणे हे माझे मित्र आहेत. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. मी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोललो नाही. त्यांचा एकेरी उल्लेख केला नाही. त्यांना फक्त काही प्रश्न विचारले, असं भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलं आहे. मात्र, त्यावर आमदार निलेश राणे यांनी लगेचच पलटवार केला आहे. नवनाथचा जीव किती आणि बोलतो किती? असा सवाल करतानाच नवनाथ बन माझा कधीच मित्र नव्हता, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्ला चढवला आहे.
नवनाथ बन तुझे करिअर आता सुरू झाले आहे. नवनाथ माझा मित्र नाही. मी 2009 मध्ये खासदार होतो. मी त्याला मित्र म्हणत नाही. आम्हाला बनने शिकवू नये. आम्ही याला उत्तर का द्यायचे? आम्ही आमच्या नेत्यांना बोलू, असं सांगतानाच पुणे पदवीधर निवडणुकीत नियोजन कुठे चुकले? यावर विचार मंथन व्हावे. एकनाथ शिंदेंवर खापर कशाला फोडता? पदवीधरसाठी उमेदवार कोण होतं? हे आमच्या तिथल्या नेत्याला माहीतच नव्हते. आता आरोप-प्रत्यारोप नको, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
नवनाथ कसा जिंकला?
माझ्या मालवण निवडणुकीत काय झाले? हे बोललो तर अनेक पुस्तके उघडतील. भाजप आमचाच पक्ष आहे. कोणीतरी येणार आणि आम्हाला प्रश्न विचारणार हे नाही चालणार. हा नवनाथ निवडणूक कशी जिंकला हे माहिती आहे का? त्याच्या बाजूचा प्रभाग मला माहिती आहे. सर्वच नेते माझे मित्र आहेत, असं राणे म्हणाले.
शिंदेंची बाजू घेतली का?
भाजपमुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलं होतं. त्याचाही निलेश राणे यांनी समाचार घेतला. उठाव कोणी केला? तब्बल ४० आमदार होते. काय बोलणार? विरोधकांना संधी देऊ नका. नवनाथचा जीव केवढा.. बोलतो केवढा. आम्ही जबाबदारी एकमेकांवर ढकलणार नाही. पण आमच्या नेत्यावरची टीका कशी सहन करू? असं सांगतानाच पूर्णेकर विषयात एकनाथ शिंदेंची बाजू घेतली का? असा सवालही त्यांनी केला.
सत्तारांची जीभ विषारी
यावेळी त्यांनी त्यांच्याच पक्षाचे नेते अब्दुल सत्तार यांना चिमटे काढले. अब्दुल सत्तार काय बोलतात याकडे लक्ष देणार नाही. ते काँग्रेसमध्ये असतानाही बोलत होते. त्यांची जीभ विषारी आहे, असं ते म्हणाले.
