मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेंची बंद दाराआड चर्चा; संजय राऊत असं म्हणाले ज्याने…
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गुप्त भेटीने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देत, भेटीचे महत्त्व कमी लेखले, पण राजकीय संबंधांची आणि पक्षाच्या विभाजनाची आठवण करून दिली. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती आणि एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या मोठ्या घडामोडींवर सूचक विधान केले, ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे काल एका कार्यक्रमानिमित्ताने एकत्र आले होते. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी या तिन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे या तिन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बंद दाराआड चर्चा झाली असेल तर होऊ द्या. बंद दाराआड फक्त राजकीयच चर्चा होते का? आणि झाली असेल तर चांगलंच आहे, असं सूचक विधान संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केलं आहे.
2019मध्ये मी उद्धव ठाकरेंच्या फोनची वाट पाहत होतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात म्हटलं होतं. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. वाट पाहण्याची गरज नाही. राजकीय मार्ग बदलले तरी विचार एक असतो. नाती अशी तुटत नाहीत. आज तुम्ही ज्या ऐऱ्यागैऱ्यांसोबत बसला आहात. ती खरी शिवसेना नाही. तुम्ही ज्या पद्धतीने शिवसेनेचे तुकडे केले, ज्या पद्धतीने पक्ष चिन्ह चोरून एका दरोडेखोराच्या हातात दिले, ते तुमच्या मनाला खात आहे, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.
वैचारिक लढाई निवडणुकीत
महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे. इतर राज्यासारखं नाही. इतर राज्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या रक्ताला आसूसलेले असतात. महाराष्ट्रात फार तर आम्हाला खोट्या गुन्ह्याखाली तुरुंगात टाकतात. जसं आम्हाला टाकलं. किंवा पूर्णेकर प्रकरणांचा तपास होऊ देत नाही. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आणि विलासराव देशमुखांपर्यंतची एक चांगली परंपरा आहे. आपली वैचारिक लढाई निवडणुकीत असते. एरव्ही महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र येतो, असं राऊत म्हणाले.
आम्ही दूर तेच बरं
महाराष्ट्र लुटणाऱ्या अमित शाहांचा उदोउदो हा काय बाळासाहेबांचा विचार आहे का? हे स्पष्ट केलं पाहिजे. शाह आणि त्यांचे लोकं महाराष्ट्र लुटत आहेत. मुंबई वेगळं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो काही बाळासाहेबांचा विचार आहे का? हे बाळासाहेबांच्या विचारांचे द्रोही आहेत. असे द्रोही फडणवीस सरकारमध्ये असतील तर आम्ही दूर आहोत ते बरे आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
एप्रिल-मे महिन्यात मोठ्या घडामोडी
2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं, असं मिश्किल विधान काल राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यावरही राऊत बोलले. वारंवार आम्ही तेच सांगतोय. एप्रिल-मे महिन्यात देशात आणि राज्यात मोठी उलथापालथ होणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिल्लीत घडामोडी घडल्यावर त्याचं प्रतिबिंब महाराष्ट्रात पडेल. इतर राज्यांवरही पडेल. त्यामुळे राज ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे, असं ते म्हणाले.
