
वीकेंडला कोणता चित्रपट पाहायचा, याचा विचार करत असाल आणि काही थ्रिलर पहायचं असेल, तर तुम्ही ओटीटीवर उपलब्ध असलेला हा जबरदस्त चित्रपट पाहू शकता. ज्यामध्ये सस्पेंस आणि थ्रिल भरभरून आहे. सध्या क्राइम-थ्रिलर चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. जर तुम्हालाही असं काही आवडत असेल, तर याच वर्षी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सर्वोत्तम पर्याय आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवरही जबरदस्त रेटिंग मिळाली आहे. चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांकडून आयएमडीबीवर रेटिंग दिली जाते. हीच रेटिंग पाहून अनेकजण तो चित्रपट पहायचा की नाही, हे ठरवतात. अशातच या सस्पेंस थ्रिलर चित्रपटाला आयएमडीबीवर 7.3 रेटिंग मिळाली आहे. इतकंच नव्हे तर बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. आता हा चित्रपट ओटीटीवरदेखील उपलब्ध आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘आयडेंटिटी’. 2 जानेवारी 2025 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
‘आयडेंटिटी’ या चित्रपटाची कथा एका पोलीस अधिकारी आणि एका स्केच आर्टिस्टभोवती फिरते. हे दोघं मिळून एका हत्येचं गूढ उलगडण्याचा प्रयत्न करतात. या चित्रपटाची कथा जसजशी पुढे जाते, तसतसं हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं होतं. या गुंतागुंतींमुळे आणि प्रकरणात येणाऱ्या वळणांमुळे दोघंही गोंधळून जातात. परंतु नंतर त्यांना कळतं की ही साधीसुधी हत्या नाही तर त्यामागे एक मोठा कट आहे, जो उलगडणं खूप कठीण आहे. या हत्येचं प्रकरण सोडवताना दोघांनाही अनेक वळणांना सामोरं जावं लागतं.
या चित्रपटाच्या कथानकात इतका सस्पेंस आहे की पुढच्या क्षणी काय होणार, हे तुम्हाला कळणार नाही. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो आणि त्यातील ट्विस्ट प्रेक्षकांना विचार करायला लावतात. कारचा पाठलाग करण्यापासून ते विमानात मारामारीपर्यंत चित्रपटात अनेक जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्स आहेत, जे चित्रपटाला अधिक मनोरंजक बनवतात.
2 तास 37 मिनिटांचा ‘आयडेंटिटी’ हा मल्याळम भाषेतील चित्रपट आहे. जो ZEE5 वर तमिळ, तेलुगू, हिंदी आणि कन्नडसारख्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनस खान आणि अखिल पॉल यांनी केलंय, जे त्याचे लेखकसुद्धा आहेत. यामध्ये त्रिशा कृष्णन, टोविनो थॉमस आणि गोपिका रमेशसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. जर तुम्हालाही हा क्राइम थ्रिलर पहायचा असेल तर तुम्ही ZEE5 वर पाहू शकता.