महाभागांनो… नामदेव ढसाळ माहीत नसतील तर तातडीने राजीनामा द्या; संजय शिरसाट सेन्सॉर बोर्डावर संतापले

सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी एका चित्रपटातील नामदेव ढसाळ यांच्या कविता काढून टाकण्याचा आदेश दिला होता. तसेच त्यांनी नामदेव ढसाळ कोण? असा प्रश्न विचारल्याचे कळताच सर्वत्र संतापाची लाट पाहायला मिळत आहे.

महाभागांनो... नामदेव ढसाळ माहीत नसतील तर तातडीने राजीनामा द्या; संजय शिरसाट सेन्सॉर बोर्डावर संतापले
Sanjay Sirsat
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 27, 2025 | 4:26 PM

‘चल हल्ला बोल’ या चित्रपटासाठी बंडखोर कवी आणि दलित पॅथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांनी कविता लहिल्या आहेत. त्यांच्या कविता या चित्रपटात वापरण्यात आल्या आहेत. जेव्हा हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला तेव्हा सेन्सॉर बोर्डाने त्या हटवण्याचा आदेश दिला. तसेच सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी कोण नामदेव ढसाळ? असा प्रश्न केल्याचे समोर आले. त्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. आता यावर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट?

संजय शिरसाट यांना सेन्सॉर बोर्डाने नामदेव ढसाळ कोण असा प्रश्न केल्याचे कळताच संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘सेन्सर बोर्डावर बसणारे जे महाभाग आहेत त्यांना जर नामदेव ढसाळ माहिती नसेल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. तुम्ही तातडीने राजीनामा देणे योग्य राहील…’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय आहे प्रकरण?

‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट १ जुलै २०२४ रोजी मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डकडे सबमिट करण्यात आला होता. पण चित्रपटातील कवितांमध्ये शिव्या आणि अश्लीलता असल्याचे मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मांडले. त्यानंतर या कविता नामदेव ढसाळ यांनी लिहिल्याची माहिती देण्यात आली होती. त्यावर अधिकाऱ्यांनी, ‘कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही’ असे उत्तर दिले होते. सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या या उत्तराने सर्वजण संताप व्यक्त करीत आहेत.

‘चल हल्ला बोल’ चित्रपटाविषयी

‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश बनसोडे यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा ही दलित पँथर आणि युवा क्रांती दल या चळवळींवर आधारीत आहे. हा चित्रपट डिसेंबर २०२४मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर गेले आहे.