तुझ्यासारखा कोणीच नाही..; मोहम्मद सिराजसाठी आशा भोसलेंच्या नातीची खास पोस्ट, उंचावल्या भुवया

दिवसातल्या नवव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सिराजने ॲटकिन्सचा त्रिफळा उद्ध्वस्त करून सगळ्या नाट्याला पूर्णविराम दिला अन् भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करत भारतीय क्रिकेटप्रेमींना जल्लोष करण्याची संधी उपलब्ध करून दिली.

तुझ्यासारखा कोणीच नाही..; मोहम्मद सिराजसाठी आशा भोसलेंच्या नातीची खास पोस्ट, उंचावल्या भुवया
Zanai Bhosle and Mohammed Siraj
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 05, 2025 | 9:15 AM

कॅप्टन शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ओव्हल कसोटीत विजय मिळवत मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. अखेरच्या दिवशी भारताने 35 धावांचा बचाव केला. पाच सामन्यांच्या मालिकेत संघाची सुरुवात पराभवाने झाली असली, तरी शेवट मात्र विजयाने झाला. बुमराच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजने केलेली कामगिरी विशेष लक्षणीय ठरली. खेळाडूंची जबरदस्त कामगिरी पाहून संपूर्ण देशवासियांना खूप आनंद झाला. सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींसह असंख्य कलाकारही सोशल मीडियाद्वारे आनंद व्यक्त करत आहेत. यात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसलेचाही समावेश होता. जनाईने भारताच्या विजयानंतर इन्स्टा स्टोरीमध्ये एक किंवा दोन नाही तर तब्बल बारा पोस्ट लिहिल्या आहेत. त्यात तिने सिराजचा विशेष उल्लेख करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

जनाई आणि मोहम्मद सिराज हे पहिल्यांदा एका वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र दिसले होते. या पार्टीमधील दोघांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तेव्हापासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु सिराजला भाऊ मानत असल्याचं जनाईने स्पष्ट केलं आहे. या पोस्टमध्ये तिने खुद्द सिराजचा उल्लेख ‘भाई’ (भाऊ) असा केला आहे.

ओव्हलवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने पाच विकेट्स घेतल्या. शेवटचा विकेट घेऊन त्याने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या त्याचीच जोरदार चर्चा आहे. जनाईनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकामागून एक अशा बारा स्टोरीज शेअर केल्या आहेत. सिराजची दमदार कामगिरी पाहून ती इतकी खुश आहे की तिने खास त्याच्यासाठी ही पोस्ट लिहिली आहे.

यामध्ये जनाईने सिराजचा फोटो शेअर करत लिहिलं, ‘खूप अभिमान वाटतोय, मी स्वत:ला रोखू शकत नाही. ज्या दिवशी मी सिराज भाईला भेटले, तेव्हापासून मी त्याच्या नीतीमत्तेनं आणि व्यक्तीमत्त्वानं खूप प्रेरित झाले. तो एक असा माणूस आहे, जो खरंच तुम्हाला चमत्कारावर विश्वास ठेवायला भाग पाडेल. माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत. पण तुझ्यासारखा कोणी नव्हता आणि नसेलही. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत आणि तुझ्यासोबत आमचंही हृदय भारतासाठी धडधडतंय.’ जनाईच्या या पोस्टचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जनाई ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि अनुजा यांची मुलगी आहे. विविध कार्यक्रमांमध्ये ती आजी आशा भोसले यांच्यासोबत उपस्थित असते. तर काही पार्ट्यांमध्ये तिला बहीण श्रद्धा कपूरसोबतही पाहिलं गेलंय. जनाईचं सौंदर्य हे कोणत्याही अभिनेत्रीला, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स यांनाही टक्कर देणारं आहे.