Grammy Awards 2025: भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांनी पटकावला प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार

भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांनी पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. यावर्षी निर्माते रिकी केज, सितारवादक अनुष्का शंकर आणि भारतीय वंशाच्या ब्रिटिश कलाकार राधिका वेकारिया यांनाही नामांकन मिळालं होतं.

Grammy Awards 2025: भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांनी पटकावला प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार
Chandrika Tandon
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 03, 2025 | 11:38 AM

संगीत क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित 67 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा सोमवारी (3 फेब्रुवारी) पार पडला. या पुरस्कार सोहळ्या भारतीय वंशाच्या ग्लोबल बिझनेस लीडर आणि संगीतकार चंद्रिका टंडन यांनी बाजी मारली. ‘त्रिवेणी’ या अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. प्राचीन मंत्र आणि जागतिक संगीत यांचा सुंदर मिलाफ या अल्बममध्ये पहायला मिळतो. 71 वर्षीय चंद्रिका टंडन यांनी ‘बेस्ट न्यू एज’, ‘चांट अल्बम’ श्रेणीमध्ये हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. या अल्बममध्ये सात गाणी असून ध्यानसाधनेसाठी आणि मन:शांतीसाठी त्यांची रचना केल्याचं टंडन सांगतात.

या अल्बममध्ये चंद्रिका टंडन यांनी दक्षिण आफ्रिकेतील बासरीवाद वॉटर केलरमन आणि जपानी सेलिस्ट एरु मात्सुमोतो यांच्यासोबत मिळून वैदिक मंत्र सादर केले आहेत. तीन नद्यांच्या संगमावरून या अल्बमला ‘त्रिवेणी’ असं नाव दिलंय. त्याचप्रमाणे यामध्ये तीन वेगवेगळ्या शैलींचंही प्रतिनिधीत्व करण्यात आलं आहे. “संगीत म्हणजे प्रेम, संगीत आपल्या सर्वांमध्ये प्रकाश प्रज्वलित करते आणि आपल्या आयुष्याच्या अंधाऱ्या काळातही संगीत आनंद आणि हास्य पसरवते”, अशा शब्दांत चंद्रिका टंडन यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

चेन्नईमधील एका पारंपरिक विचारांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात चंद्रिका यांचा जन्म झाला. मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. चंद्रिका कृष्णमूर्ती टंडन आणि त्यांची धाकटी बहीण इंद्रा या लहानपणापासूनच संगीताशी जोडल्या गेल्या आहेत. चंद्रिका यांना कुटुंबातूनच सामवेदाच्या शिकवणी मिळाल्या आहेत. कर्नाटक संगीतासोबततच वैदिक मंत्रसुद्धा त्यांना लहानपणापासून शिकवले गेले.

एकीकडे इंद्रा नूयी यांनी पेप्सिकोचं सीईओ म्हणून 12 वर्षे नेतृत्व केलं आणि जगभरातील बिझनेस विश्वातील 50 सर्वांत शक्तीशाली महिलांपैकी एक बनल्या. तर दुसरीकडे चंद्रिका टंडन या मॅककिन्से इथं पहिल्या भारतीय-अमेरिकन महिला भागीदार होत्या. त्यांनी न्यूयॉर्कस्थित टंडन कॅपिटल असोसिएट्सची स्थापना केली. आयआयएम अहमदाबादमधून पदवीधर झालेल्या चंद्रिका या जागतिक स्तरावरील बिझनेस लीडर ठरल्या. 2015 मध्ये त्यांनी पती रंजन यांच्यासोबत मिळून न्यूयॉर्क स्कूल ऑफ इंजिनीअरिंगला 100 दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली होती. आता संस्थेनं त्यांच्या नावात टंडन नाव जोडलं आहे.

चंद्रिका यांनी शास्त्रीय गायिका शुभ्रा गुहा आणि गायक गिरीश वाजलवार यांच्याकडून संगीताचं प्रशिक्षण घेतलं. याआधी 2010 मध्ये त्यांच्या ‘ओम नमो नारायण: सोल कॉल’ या अल्बमसाठी पहिल्यांदा ग्रॅमीचं नामांकन मिळालं होतं.