Aishwarya Rai | परदेशात भारतीयांना अशिक्षित समजलं जातं का? ऐश्वर्या रायने सांगितला किस्सा

2012 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाली होती की तिने 'मिस वर्ल्ड' या सौंदर्यस्पर्धेतील मोठ्या यशाचा विचार केवळ करिअरमधील एक पाऊल म्हणून नाही तर आपल्या देशासाठी कल्चरल ॲम्बेसेडर बनण्याच्या माध्यमातून विचार केला होता.

Aishwarya Rai | परदेशात भारतीयांना अशिक्षित समजलं जातं का? ऐश्वर्या रायने सांगितला किस्सा
Aishwarya Rai
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 16, 2023 | 2:50 PM

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या अभिनय आणि सौंदर्यासोबतच विचारांसाठीही ओळखली जाते. डेव्हिड लेटरमॅनच्या एका टॉक शोमध्ये तिने दिलेल्या उत्तराची चांगलीच चर्चा झाली होती. या शोमध्ये तिला विचारण्यात आलं होतं की भारतात मुलांनी त्यांच्या आईवडिलांसोबत राहणं सर्वसामान्य आहे का? त्यावर ऐश्वर्याने दिलेल्या उत्तराने सर्व भारतीयांची मनं जिंकली होती. तिने म्हटलं होतं की, “आम्ही भारतीय आमच्या आईवडिलांना भेटण्यासाठी अपॉईंटमेंट घेत नाही.” तर एका दुसऱ्या मुलाखतीत ऐश्वर्याने भारत आणि भारतीयांविषयी असलेल्या अशा गैरसमजुतींबद्दल वक्तव्य केलं, ज्यांचा सामना अनेकदा परदेशात करावा लागतो.

ऐश्वर्याने सांगितलं की लोक तिला असे-असे प्रश्न विचारायचे, ज्यामुळे ती थक्क व्हायची. 2012 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाली होती की तिने ‘मिस वर्ल्ड’ या सौंदर्यस्पर्धेतील मोठ्या यशाचा विचार केवळ करिअरमधील एक पाऊल म्हणून नाही तर आपल्या देशासाठी कल्चरल ॲम्बेसेडर बनण्याच्या माध्यमातून विचार केला होता.

ती म्हणाली, “मला हे जाणून खूप आश्चर्य वाटलं की जगातील बऱ्याच भागात वर्तमानकाळातील भारताबद्दल किती गैरसमजुती आहेत आणि मी स्वत:ला फार नशीबवान मानते की त्या गैरसमजुती दूर करण्याची संधी मला मिळाली. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जेव्हा सुरुवातीला मी जरा आरामात इंग्रजी बोलायची, तेव्हा ते मला विचारायचे ‘तू भारतात शिकलीस का? तू खरंच चांगली इंग्रजी बोलतेस.’ तेव्हा मी त्यांना सांगायचे की, ठीक आहे, आम्ही भारतात सुद्धा इंग्रजी शिकतो.”

‘द लेट शो विथ डेव्हिड लेटरमॅन’मध्ये ऐश्वर्याला प्रश्न विचारण्यात आला होता, “तू तुझ्या आई-वडिलांसोबत राहतेस का? हे खरंय का? भारतात मुलांनी त्यांच्या पालकांसोबत राहणं सर्वसामान्य आहे का?” त्यावर उत्तर देताना ऐश्वर्या म्हणाली, “आपल्या आईवडिलांसोबत राहणं ठीक आहे. कारण भारतात ही सर्वसामान्य गोष्ट आहे. आम्हाला आमच्या आई-वडिलांसोबत मिळून जेवण जेवण्यासाठी वेगळी अपॉईंटमेंट घ्यावी लागत नाही.” हे ऐकताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ऐश्वर्याचं उत्तर ऐकल्यानंतर लेटरमॅन म्हणाला, “मला असं वाटतंय की आज रात्री आपण इथून काहीतरी शिकून जातोय.”