Indigo : इंडिगो संकटामुळे प्रवासी चिंतेत, रेल्वेची मदतीसाठी धाव, उचललं मोठं पाऊल
इंडिगो एअरलाइन्सच्या अनेक फ्लाइट्स रद्द झाल्याने देशभरात मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गोंधळानंतर भारतीय रेल्वेन मोठं पाऊल उचलत मदतीसाठी धाव घेतली आहे. अनेक ट्रेन्सच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

देशभरात इंडिगो आणि इतर अनेक विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केल्यानंतर, मोठा गदारोळ माजला आहे. लाखो प्रवासी अडकून पडले असून त्यांना मोठा त्रास, मनस्तापही सहन करावा लागत आहे. त्यानंतर अनेक प्रवाशांनी अचानक रेल्वेकडे गर्दी केली. वाढती गर्दी आणि तिकिटांची वाढती मागणी लक्षात घेता, भारतीय रेल्वेने तातडीने मोठी पाऊलं उचलली आहेत. 6 डिसेंबर 2025 पासून रेल्वेने अनेक मार्गांवर अतिरिक्त कोच जोडण्याचा आणि रेल्वेच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय लागू केला आहे. यामुळे त्रासलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
इंडिगोच्या विमानाची उड्डाणं रद्द होण्याचा सर्वात मोठा परिणाम दक्षिण भारतात जाणवला, जिथे रेल्वेने क्षमता वाढवण्यासाठी विशेष तयारी केली. दक्षिण रेल्वेने 18 गाड्यांमध्ये नवीन कोच जोडले आहेत. अतिरिक्त प्रवाशांची बसण्याची व्यवस्था करण्यासाठी अनेक लोकप्रिय मार्गांवर स्लीपर आणि चेअर कारची संख्या वाढवण्यात आली आहे. यामुळे बेंगळुरू, चेन्नई, कोइम्बतूर आणि तिरुवनंतपुरम सारख्या शहरांमध्ये प्रवास पुन्हा सुरळीत सुरू झाला आहे.
उत्तर रेल्वेमुळे दिल्ली मार्गावरील गर्दी कमी
दिल्लीला जाणाऱ्या आणि दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याने, उत्तर रेल्वेने आठ प्रमुख गाड्यांमध्ये अतिरिक्त एसी आणि चेअर कार जोडले आहेत. हा बदल तात्काळ लागू झाला आहे. यामुळे पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील प्रवाशांना विशेष दिलासा मिळत आहे.
दिल्ली-मुंबई मार्गावर पश्चिम रेल्वेचा मोठा उपक्रम
देशभरातील अनेक विमानांची उड्डाणं रद्द झाल्यामुळे दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अत्यंत कठीण झाला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने 4 प्रमुख गाड्यांमध्ये 3 एसी आणि 2 एसी कोच जोडले आहेत. आज, अर्थात 6 डिसेंबरपासून नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर, या वर्दळीच्या मार्गावर हजारो प्रवाशांना सीट्स मिळू लागल्या आहेत.
पूर्व मध्य रेल्वेने पाटणा ते दिल्ली प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष पावले उचलली आहेत. राजेंद्र नगर-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसमध्ये 6 ते 10 डिसेंबर दरम्यान पाच अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जात आहेत. यासोबतच, ट्रेनमध्ये २ एसी कोचची संख्याही वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे पाटणा-दिल्ली मार्गावरील जागांवर जास्तीत जास्त दबाव कमी झाला आहे.
ईस्ट कोस्ट, ईस्टर्न आणि NFR ने वाढवली क्षमता
ओडिशाहून दिल्लीला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी, ईस्ट कोस्ट रेल्वेने 20817, 20811 आणि 20823 या गाड्यांच्या 5 फेऱ्यांमध्ये 2 एसी कोच जोडले आहेत. दरम्यान, पूर्व रेल्वेने 7 आणि 8 डिसेंबर रोजी तीन मुख्य गाड्यांमध्ये स्लीपर कोच जोडले. ईशान्येकडील प्रवाशांसाठी, ईशान्य सीमावर्ती रेल्वेने 6 ते 12 डिसेंबर दरम्यान प्रत्येकी आठ अतिरिक्त फेऱ्यांसह 3 एसी आणि स्लीपर सीट्समध्ये लक्षणीय वाढ केली.
रेल्वेकडून 4 स्पेशल ट्रेन्स
विमान उड्डाण रद्द झाल्यामुळे अडकलेल्या प्रवाशांना सोडवण्यासाठी आणि त्यांचा लांबचा प्रवास सुखकर व्हावायासाठी रेल्वेकडून 4 विशेष गाड्या चालवण्यात आल्या आहेत. यामध्ये गोरखपूर-आनंद विहार स्पेशल, नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल स्पेशल, नवी दिल्ली-श्रीनगर सेक्टरसाठी वंदे भारत स्पेशल आणि हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम स्पेशल यांचा समावेश आहे. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी अनेक गाड्या एकेरी मार्गावर चालवण्यात आल्या.
इंडिगो व इतर कंपन्यांची विमान उड्डाणे रद्द झाल्यानंतर तिकिटांच्या मागणीत अचानक वाढ झाल्याने दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई आणि पटना सारख्या मोठ्या शहरांमधील लोक चिंतेत होते. अशा वेळी, रेल्वेचे हे पाऊल खूप महत्त्वाचे ठरले आहे, कारण हजारो अतिरिक्त जागां उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना एक सुरक्षित पर्याय मिळाला.
