
Rohit Shetty : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील जुहू परिसरातील निवासस्थानी रात्री उशिरा झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर तपासात एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करून चौकशी केली असता, गोळीबाराची संपूर्ण घटना आरोपीने व्हिडिओ कॉलद्वारे कोणाला तरी लाईव्ह दाखवली असल्याचा संशय पोलिसांना आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असे संकेत मिळाले आहेत की, गोळीबाराच्या वेळी आरोपी व्हिडिओ कॉलवर सक्रिय होता. त्यामुळे आता पोलीस या दिशेने सखोल तपास करत असून, गोळीबाराची घटना नेमकी कोणाला दाखवण्यात आली, याचा शोध घेतला जात आहे. हा कॉल देशातच झाला की परदेशातून तसेच यामागे कुठली गुन्हेगारी टोळी किंवा मास्टरमाइंड आहे का याचाही तपास सुरू आहे.
रोहित शेट्टीचे घर मुंबईतील जुहू या उच्चभ्रू आणि सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील परिसरात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारात दोन गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एक गोळी पहिल्या मजल्यावरील काचेवर तर दुसरी गोळी तिसऱ्या मजल्यावरील काचेवर लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन डेटा आणि तांत्रिक पुरावे तपासण्यात येत आहेत. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनची फॉरेन्सिक तपासणीही सुरू करण्यात आली असून व्हिडिओ कॉल, सोशल मीडिया किंवा मेसेजिंग अॅप्सद्वारे संपर्क साधण्यात आला होता का याचा शोध घेतला जात आहे.
या घटनेनंतर रोहित शेट्टीच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. जुहू परिसरात अतिरिक्त पोलीस पथके तैनात करण्यात आली असून मुंबई गुन्हे शाखेचे विशेष पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. तसेच, दिग्दर्शकाच्या सुरक्षेचाही नव्याने आढावा घेण्यात येत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, गोळीबारासारख्या गंभीर घटनेत व्हिडिओ कॉलद्वारे लाईव्ह प्रक्षेपण केल्याचा संशय खरा ठरल्यास हे प्रकरण केवळ धमकीपुरते मर्यादित नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलीस तपास अधिक तीव्र करण्यात आला असून या प्रकरणातील सर्व दुवे उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे.